दोन दिवसांत सोयाबीनचे भाव सहाशे रूपयांनी उतरले, शेतीमालाच्या दरातील चढ-उताराने शेतकऱ्यांची घालमेल

0
249
जामखेड न्युज – – – – 
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादन घटले तर नगदी पीक समजले जाणारे कापूस आणि सोयाबीनच्या दराची घसरण पहाता शेतकरी चिंताग्रस्त होते. परंतु मागील आठवड्यात दरांमध्ये चांगलीच वाढ होत, शुक्रवारी ( दि. २६) येथील विश्वतेज जिनिंग प्रेसिंग येथे ८ हजार ५०० रु. प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केली. लातूर मार्केट मध्ये सोयाबीन उच्च दर्जाची ७ हजार १०० प्रतिक्विंटल असा दर मिळाला. परंतु रविवारी (दि. २८ ) सोयाबीन ६०० तर कापूस २०० रुपये प्रतिक्विंटल उतरले. शेतीमालाचे दरात सतत चढ उतार पाहून शेतकऱ्यांच्या मनाची घालमेल सुरू आहे.
गेल्या हंगामात सोयाबीन प्रतिक्विंटल ११ हजार रुपयेच्या पुढे गेल्याने यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पहिली पसंती दिली. त्यामुळे कापसाला मागे सारून सोयाबीन नंबर एकचे पीक ठरले. सुरवातीला पाऊस वेळेवर पडल्याने सोयाबीन जोमात आले परंतु फुले लागतं असताना पावसाने ओढ दिली तसेच शेंगा लागल्यानंतर अतिवृष्टी झाली.
याचा मोठा फटका बसून उत्पादन घटले. दर चांगला असल्याने हे नुकसान भरून निघेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरुवात करताच केंद्र शासनाने तेल आयातीवरील कर घटवले, सोया पेंड आयात केली. याचा परिणाम म्हणून सोयाबीनचे दर कोसळायला सुरुवात झाली.
पांढऱ्या सोन्याला पुन्हा झळाळी; सहाशे रुपये वाढ
११ हजारांवर असलेले दर ४ हजार ८०० ते ५ हजारांवर आले. अतिवृष्टीमुळे आणि कोसळणारे दर पहाता शेतकरी चिंतेत होता. दर वाढतील या आशेवर ७० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीनचे खळे करुन माल घरातच साठवून ठेवले आहे. हा अंदाज खरा ठरत असून मागील सात-आठ दिवसांपासून सोयाबीन दरात वाढ होत असून शुक्रवारी (दि. २६) लातूर मार्केट मध्ये प्रतिक्विंटल ७ हजार १०० तर, पोटली सोयाबीन ६ हजार ५५० असा दर मिळाला आहे. आडस येथील व्यापाऱ्यांनी सोयाबीनला ६ हजार ७०० या दराने खरेदी केली.
लातूर नंतर सांगली सोयाबीनची राज्यातील मोठी बाजारपेठ आहे. येथे ही शुक्रवारी सोयाबीन ७ हजार ५०रु. प्रतिक्विंटल दराने विकला गेला. पांढर सोनं म्हणून ओळखले जाणारे कापसाचे यंदा उत्पादन घटले आहे. उत्पादनाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने सुरवातीपासूनच यावर्षी कापसाला साडेसात हजार प्रतिक्विंटल दर मिळाला. वाढत तो ९ हजारांवर पोचला होता. दिवाळीमध्ये कापसाचे दर घसरत ७ हजार ८०० पर्यंत खाली आले. मागील आठवड्यापासून कापसाचे दर वाढत असून ७ हजार ८०० वर पोचलेल्या कापसाला शुक्रवारी ( दि. २६) ८ हजार ५०० असा दर मिळाला. वाढते दर पाहून शेतकरी समाधान व्यक्त करीत होते. परंतु दोन दिवसात सोयाबीन, कापसाचे दर घसरण्यास सुरू झाले.
रविवारी (दि. २८) सोयाबीनला ६ हजार ५००रु. प्रतिक्विंटल दर मिळाला. कापूस ८ हजार ३०० प्रतिक्विंटल असा आहे. हे पहाता शुक्रवार च्या तुलनेत रविवारी सोयाबीन ६००, कापूस २०० अशी दरात घट झाली. सतत शेतीमालाच्या दरातील चढ-उताराने शेतकऱ्यांची घालमेल होत असली तरी दर वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here