जामखेड न्युज – – –
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र बारामती,कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांसाठी डाळींब पीक शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि.२४ रोजी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिंगणापूर येथे हा अभ्यास दौरा होणार आहे.
ADVERTISEMENT

केवळ पावसाचे पाणी साठवून शिंगणापुर आणि परिसरात कोरडवाहू भागांमध्ये निर्यातक्षम डाळींबाचे उत्पादन घेण्यात आले आहे.तसेच कांदा पिकाचीही मल्चिंगवरती लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यात आले आहे.या दौऱ्यात या पिकांची सर्व माहिती शेतकऱ्यांना घेता येणार आहे. कर्जत व जामखेड तालुक्यातील सुमारे १५० शेतकरी या कृषी दौऱ्यात सहभागी असणार आहेत.
कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा,उडीद, सोयाबीन आदी पिकांबरोबरच डाळींब द्राक्ष फळबागांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण व्हावे तसेच शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलावे यासाठी आ.रोहित पवारांचे सुक्ष्म नियोजन सुरू आहे.याचाच भाग म्हणुन यापूर्वीही राज्यातील विविध संशोधन केंद्रावर कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आ.रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांना संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्या मदतीने वेळोवेळी प्रशिक्षण देत आले आहेत. पिकांबाबत नवे प्रकार, भरघोस उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या नवीन जाती आदींची प्रात्याक्षिके घेऊन ‘याची देही याची डोळा’ शेतकऱ्यांना याची अनुभूती आलेली आहे.त्यामुळे कर्जत जामखेडच्या शेतीची आता संपन्नतेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.