जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – -(सुदाम वराट)
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अनेक सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ केला जातो. तसा दसरा ते दिवाळीच्या दरम्यान अनेक साखर कारखान्याची धुराडे पेटून हंगाम सुरू होतात. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी ऊस तोड कामगार दसरा होताच आपली बिर्हाडे घेऊन कारखान्याकडे जात असल्याचे दिसून येत आहे. राज्यात नव्हे तर देशात बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी आहे. बीड सह जालना, परभणी, नगर जिल्ह्यातील जामखेड व पाथर्डी येथिल मजुर मोठ्या प्रमाणावर ऊस तोडी साठी जात आहेत.
बीड जिल्ह्यासह नगर मधील जामखेड व पाथर्डी येथिल
ऊसतोड मजूर हे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यातील साखर कारखान्यावर मजूर म्हणून पाहण्यास मिळतात.अनेक गावातून ऊसतोड कामगार मजुरांचे लोंढे साखर कारखान्याच्या वाटेला लागल्याने ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्या ओस पडल्याची चित्र पाहावयास मिळत आहे.ट्रक,ट्रॅक्टर, पिक-अप आदि वाहनातून गेल्या ८ ते १० दिवसापासून दररोज हजारो कामगार विविध कारखान्यावर रातोरात व दिवसभर जात आहेत.
या वर्षी अनेक ठिकाणी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरापर्यंत चालू राहणार असा अंदाज वर्तविला जात आहे.यावर्षी ऊसतोड मजुरांचा दसरा सन गावाकडे घरातच साजरा होऊन,दिवाळी ज्या-त्या कारखान्यावर उसाच्या फडातच साजरी होणार आहे.दिवाळी सणा पर्यंत ९५% ऊसतोड कामगार कारखान्यावर पोहचलेले असतील.
या वर्षी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामात अतोनात नुकसान झाल्याने शेतातील उत्पन्नात घट झाली आहे.त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतातील आर्थिक उत्पन्नाचे गणित बिघडल्याने या वर्षी मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार कारखान्यावर गेल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांचा भरणा मोठा आहे.त्यामध्ये अनेकांपुढे मुलांच्या शिक्षणाची समस्या,घरातील वृद्ध आई-वडिलांची होत असलेली आबाळ त्यांच्या आरोग्याचा प्रश्न हे सर्व बाजूला ठेवून पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजूरी शिवाय पर्याय उरलेला नाही.
अनेक सुशिक्षित बेरोजगार एम ए झालेले तरूण पोटाची खळगी भरण्यासाठी तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासारखे हातात कोयता घेऊन ऊसतोडणी करण्यासाठी जातात.
नगर जिल्हा हा साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पण याच जिल्ह्यातील जामखेड व पाथर्डी तालुक्यातील ऊसतोड मजूर मोठ्या प्रमाणावर पश्चिम महाराष्ट्रात जात असतात दोन्ही तालुके जरी राजकीय दृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रात असले तरी ते भौगोलिक दृष्ट्या मराठवाड्यात आहेत त्यामुळे जे लाभ किंवा शासकीय अनुदाने मराठवाड्याला मिळतात तिच अनुदाने जामखेड व पाथर्डी तालुक्याला मिळावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.






