साताऱ्यातील भरपावसातील पवारांच्या सभेची द्विवर्षपूर्ती; रोहित पवारांनी दिला आठवणीला उजाळा

0
245
जामखेड न्युज – – – – 
दोन वर्षांपूर्वी आज १९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सातार्यात सभा सुरू होती. आभाळ काळेकुट्ट भरून आले होते. पावसाची शक्यता गृहीत धरून नेते मंडळी भाषणे आटोपते घेत होती. अशात पाऊस आला तर शरद पवार भाषण करू शकतील का अशी चिंता राष्ट्रवादी नेत्यांत होती. शरद पवार भाषणाला उभे राहिले आणि पावसाने बरसणे सुरू केले. धो-धो पाऊस सुरू झाला. मांडवाच्या कणातीतून पाणी व्यासपीठावर पडू लागले, मात्र ऐंशी वर्षे असलेले शरद पवार थांबले नाहीत, उलट त्यांनी भरपावसात उभे राहत अजून जोशपूर्ण भाषण केले. राजकीय विश्लेषकांच्या मते शरद पवारांच्या या भाषणाने एक नवचैतन्य कार्यकर्त्यांत आले, पवारांचे या वयात तरुणाला लाजवेल असे पावसातले भाषण राज्यातील जनतेला भावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जी अपेक्षा होती त्यापेक्षा लक्षणीय अशा ठिकाणी जास्त जागांवर विजय मिळवता आला. आज साताऱ्यातील शरद पवारांच्या भरपावसातील सभेला दोन वर्षे होत असताना पवारांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पेजवर आठवण काढत, ‘आदरणीय शरद पवार साहेब साताऱ्यातील तुमची ही सभा जिद्दीने लढण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीतही यश खेचून आणण्यासाठी अखंड संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील!, असे म्हणत आपली भावना व्यक्त केली आहे.
                       ADVERTISEMENT
२०१९ च्या ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी अखेरच्या टप्यात होती. भाजपचा प्रचार टिपेला पोहचला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक मोठाले मोहरे भाजपच्या गळाला लागले होते. निवडून यायचे असेल तर भाजप शिवाय पर्याय नाही अशी अनेक नेत्यांची भावना झाली होती. मधुकर पिचडांसारखे अनेक वर्षांचे सहकारी शरद पवारांना सोडून गेले होते. अशात भाजप पक्षात मोठा जोश भरला होता. देवेंद्र फडणवीस प्रत्येक सभा विजयी अविर्भावात पार पाडत होते. ‘मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन’ या त्यांच्या वाक्यावर तुफान टाळ्या पडत होत्या. भाजपच्या सभांना मोठी गर्दी होत असताना फडणवीस राष्ट्रवादी अर्थात पवारांना लक्ष करत विजयी माहोल तयार करत होते. या परस्थितीत राष्ट्रवादीचे अवसान पुरते गहाळ झाल्यासारखे झाले होते. त्यात पवारांवर ईडीने तक्रार लावली त्यामुळे राष्ट्रवादीत अजूनच चिंता होती. विजय हा दुरापास्त दिसत होता. काँग्रेसची पोहच सर्वांना ठाऊक होती, तर भाजप-सेना एकत्रित आरामात निवडणूक जिंकेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला अगदी मोजक्या जागा मिळतील असे वातावरण तयार झाले होते. मात्र साताऱ्यातील भरपावसातील शरद पवारांची सभा आणि पावसाच्या सरी अंगावर झेलत ओलेचिंब कपड्यावर त्यांनी केलेले जोशपूर्ण भाषण अवघ्या महाराष्ट्राला भावले आणि निकाला नंतर अनपेक्षित पणे वाढलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागांनी महाराष्ट्रात स्वप्नातही न वाटणाऱ्या अशा नव्या राजकीय समिकरणाला जन्म दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here