जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
नगर जिल्ह्यासह कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजनाचा अखेर मुहूर्त ठरला असुन राष्ट्रवादीचे युवा नेते आ.रोहित पवारांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. महामार्ग क्रं.५१६-अ. नगर-करमाळा व राष्ट्रीय महामार्ग क्रं.५४८-ड श्रीगोंदा-जामखेड या महामार्गाचे भुमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दि.२ ऑक्टोंबर रोजी होणार आहे.आ. रोहित पवार यांनी मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मंजुरी दिल्याबद्दल त्यांचे नुकतेच आभार मानले होते आणि त्यांना या महामार्गाच्या भूमिपूजनासाठी निमंत्रित केले होते.
राष्ट्रीय महामार्गांमुळे कर्जत जामखेड मतदारसंघासह अनेक जिल्ह्यांच्या अर्थकारणात क्रांती होणार आहे.कोणत्याही मार्गाच्या कामासाठी मंजुरी मिळाली म्हणजे प्रत्यक्षरीत्या त्या रस्ता कामाला प्रारंभ होतो असे होत नाही.मंजुरी मिळून अनेक अडचणींच्या विळख्यात अडकून पडलेल्या या महामार्गाच्या कामासाठी आ.रोहित पवारांनी घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत. भु-संपादनाचा रेंगाळत पडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला मोबदला मिळवून दिला.या मार्गात काही अंतरावरील रस्ता वनविभागाच्या हद्दीत येत होता त्याला मंजुरी मिळवण्यासाठी आ.पवारांनी नागपूर येथील कार्यालयाच्या संबंधित मुख्य अधिकाऱ्यांशी वैयक्तिक लक्ष घालुन अडचणींचा मार्ग मोकळा केला.प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांच्या कायम संपर्कात राहून वेळोवेळी बैठका घेऊन हा विषय तडीस नेण्याचे श्रेय हे एकमेव आ. रोहित पवारांनाच जाते.या कामी त्यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या तीन वेळा भेटी घेऊन चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यामध्ये लक्ष घालून विनंती केल्यानुसार या महामार्गातील श्रीगोंदा-जामखेड व नगर-करमाळा या रस्त्यांना मंजूरी मिळाली.आता या महामार्गाच्या निविदा प्रक्रियाही झालेल्या आहेत.महामार्गाच्या अडचणी सोडवताना आ. पवारांनी नगरचे जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,वनविभाग,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,नगर रचना विभाग,(भूसंपादन) समन्वय अधिकारी,प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग व इतर तत्सम अधिकारी, भूमी अभिलेख विभाग, सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन महामार्गातील अडचणींचे अनेक प्रश्न मार्गी लावले.सर्व अधिकाऱ्यांचा उत्साहाने मिळत असलेला प्रतिसाद व योग्य समन्वयामुळे कामे वेगाने मार्गी लागत आहेत.राष्ट्रीय महामार्गांमुळे नगर ते सोलापूर पर्यंत असलेल्या अनेक तालुक्यांना समृद्धी प्राप्त होणार आहे.अनेक उद्योग व्यवसाय, बाजारपेठा व अर्थकारणाची गंगा वाहणार आहे.