जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
दोन चांगले अधिकारी मित्र एकत्र आले तर किती मोठे सामाजिक काम करू शकतात याचा प्रत्यय आला. जामखेड येथे नव्यानेच बदली होऊन आलेले तहसीलदार योगेश चंद्रे साहेब यांचे स्पर्धा परिक्षेच्या काळातील असलेले “रुम मेट” म्हणजे खोलीतील सहकारी व सद्या उस्मानाबाद जिल्ह्य़ातील भूम पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश कांबळे या दोन अधिकाऱ्यांनी इतर अधिकाऱ्यांपुढे अशा एका सामाजिक कार्याचा आदर्श ठेवला आहे की ज्यामुळे एका वडील नसलेल्या अनाथ मुलीच्या जीवनाला दिशा मिळाली आहे.
त्याबाबत सविस्तर माहिती अशी की, भूम तालुक्यातील वरूड येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थीनी सोनाली वाघमारे ही गुणवंत विद्यार्थ्यीनी असल्याने तीला मदत करण्यास सहायक पोलीस निरीक्षक मंगेश कांबळे हे पुढे आले आणि सोनालीचा अवघड प्रश्न सोपा झाला. जातीच्या दाखल्याचा प्रश्न सोडवण्यासाठी घेऊन मंगेश कांबळेसह सोनालीची आई, आजी व मुख्याध्यापक तात्या कांबळे यांनी जामखेड येथील प्राथमिक शिक्षक असलेले गोकुळ गायकवाड यांची भेट घेतली व त्यांना हा विषय सांगितला. त्यांनीही अभिलेख कक्षातून तत्परतेने सोनालीच्या आजोबांचा १९१७ सालचा पुरावा मिळवून दिला. याचा खर्चही गोकुळ गायकवाड यांनीच केला. यानंतर जामखेड तहसील कार्यालय परिसरात पिटीशन रायटर म्हणून काम करणारे सुर्यकांत सदाफुले यांनी अत्यंत तळमळीने, आस्थेने व अपूलकीने गायकवाड सरांना साथीला घेऊन कागदपत्रांची प्रक्रिया पार पाडली. तसेच आॅनलाईन प्रस्ताव दाखल करण्याचे कामही केले.
यानंतर विषय आला तो तहसीलदार यांचा. याबाबत मात्र इथे तर दुग्धशर्करा योगच जळून आला. या कामासाठी आलेले पोलीस अधिकारी मंगेशजी कांबळे हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाचे ‘रूममेट’ (खोलीमित्र) असलेले योगेशजी चंद्रे तहसीलदार म्हणून भेटले. मग काय सोनालीच्या दाखल्याचा प्रश्नच राहिला नाही. आपल्या कार्यतत्परते मुळे नावलौकिक मिळविलेले योगेशजी चंद्रे यांनी तातडीने कर्जत उपविभागाचे प्रांत अधिकारी तथा उपजिल्हा अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि काही वेळातच सोनाली वाघमारे हिच्या दाखल्याचा प्रश्न मार्गी लागला व जातीच्या दाखवल्यामुळे येणाऱ्या संभाव्य अडचणी कायम स्वरूपीसाठी दूर झाल्या.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले, भिमटोला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम असणारे काकासाहेब रांजवण, गणेश जोशी, उत्कर्ष कुलकर्णी यांचेही या कामी विशेष सहकार्य लाभले.






