जामखेड न्युज – – –
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. अशात अनेकजण कोरोना लस घेण्यास नकार देताना दिसतायत. अशा लोकांसाठी पंजाब सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. वारंवार आवाहन करूनही कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात टाळाटाळ करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता चक्क सक्तीची ‘सुट्टी’ देण्यात येणार आहे. वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त अन्य कारणाने लसीचा पहिला डोसही न घेणाऱ्यांना 15 सप्टेंबरपासून घरी बसविण्यात येणार आहे.
पंजाब सरकारची शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोरोना आढावा बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी हे कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लस न घेणाऱ्यांमुळे राज्यातील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये, हा त्यामागील उद्देश असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
आता 15 सप्टेंबरनंतर अशा एकही लस न घेतलेल्यांना सक्तीची ‘सुट्टी’ देण्यात येणार आहे. जोपर्यंत ते कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेत नाहीत, तोपर्यंत अशा कर्मचाऱ्यांना घरी बसविण्यात येणार आहे. सध्याचा सण-उत्सवांचा काळ लक्षात घेऊन राज्यातील कोरोनाविषयक निबंधांच्या मुदतीतही 30 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, लसीचा एक डोस घेतलेल्या शिक्षक, तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत येण्यास परवानगी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. अर्थात, या सर्वांना दरआठवड्याला कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे..









