जामखेडच्या पाण्यासाठी शहराचा एल्गार! व्यापारी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जामखेड कडकडीत बंद! सात वर्षांपासून पाणी योजना रखडल्याने संतापाचा उद्रेक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंदला व्यापारी व नागरिकांचा पाठिंबा
सात वर्षांपासून पाणी योजना रखडल्याने संतापाचा उद्रेक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंदला व्यापारी व नागरिकांचा पाठिंबा
शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर अखेर जामखेडकरांचा संताप रस्त्यावर उतरला. पिण्याच्या पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी (दि. १५ नोव्हेंबर) पुकारण्यात आलेल्या जामखेड बंदला व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त तर काही भागात समिश्र प्रतिसाद दिला. शहरातील बाजारपेठा, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना बंद ठेवून नागरिकांनी पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. भाजपच्या वतीने बंद पाळू नये, असे आवाहन करण्यात आले होते. यामुळे भाजपा प्रणित व्यावसायिकांनी आपापली दुकाने उघडी ठेवली होती. मात्र एक वाजेपर्यंत जवळपास कडकडीत बंद पाळण्यात आला नंतर काही दुकाने उघडली
जामखेड शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने जनक्षोभ वाढत आहे. अनेक भागांत १५ ते २० दिवसांपर्यंत नळाला पाणी येत नाही, तर काही ठिकाणी महिनाभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
शहरातील सुमारे ३० वाड्या-वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू असून तब्बल ५० किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. शहराच्या पाणीप्रश्नाची ही गंभीर परिस्थिती असताना कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. भुतवडा तलावात मृत साठा शिल्लक असल्याने खुपच कमी दाबाने टाकीत पाणी येत आहे यामुळे काही भागात पंधरा तर काही भागात वीस दिवसानंतर पाणी मिळत आहे.
सात वर्षे उलटली, तरी पाणी योजना अपूर्णच! जामखेड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी दहिगाव-जामखेड आणि उजनी-जामखेड पाणीपुरवठा योजनांची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, सात वर्षांचा कालावधी उलटूनही नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याने या योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अतिक्रमण, रस्ता मोजणी, जलवाहिनी टाकण्याचे काम आणि विविध प्रशासकीय अडथळ्यांमुळे योजनेची कामे रखडत असल्याचे चित्र आहे. विकासकामांचे दावे होत असताना शहरातील नागरिकांना मात्र पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पाणी योजनेची कामे नेमकी कुठे अडकली आहेत? ती पूर्ण होण्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार? याची स्पष्ट उत्तरे नागरिकांना हवी आहेत. राजकीय आवाहनापेक्षा पाणीप्रश्न महत्त्वाचा! बंदच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने दुकाने व व्यवहार सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने पुकारलेल्या बंदला व्यापारी आणि नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने शहरातील बाजारपेठा बंद राहिल्या. या बंदमधून नागरिकांनी पाणीप्रश्नाबाबतची नाराजी व्यक्त केली. मतदारसंघातील विकासकामांवर लक्ष असल्याचे दावे केले जात असताना जामखेडच्या मूलभूत पाणीप्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष का दिले जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी लोकप्रतिनिधी, नगरपालिका आणि प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची मागणी होत आहे. जामखेडकरांचा सवाल एकच — पाण्यासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची? सात वर्षांपासून रखडलेल्या पाणी योजनांना गती कधी मिळणार आणि शहराला नियमित पाणी कधी मिळणार? कडकडीत बंदच्या माध्यमातून नागरिकांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना द्यावी लागणार आहेत.