Friday, November 13, 2026
Home ताज्या बातम्या संस्कारांची ७५ वर्षांची श्रीमंती! द्रौपदी अडसूळ यांच्या अमृत महोत्सवात सामाजिक उपक्रमांचा जागर!...

संस्कारांची ७५ वर्षांची श्रीमंती! द्रौपदी अडसूळ यांच्या अमृत महोत्सवात सामाजिक उपक्रमांचा जागर! देवकी-यशोदेच्या मायेचा अनोखा संगम!

0
2
संस्कारांची ७५ वर्षांची श्रीमंती! द्रौपदी अडसूळ यांच्या अमृत महोत्सवात सामाजिक उपक्रमांचा जागर!  देवकी-यशोदेच्या मायेचा अनोखा संगम!

जामखेड न्युज – – – – 

संस्कारांची ७५ वर्षांची श्रीमंती! द्रौपदी अडसूळ यांच्या अमृत महोत्सवात सामाजिक उपक्रमांचा जागर!

देवकी-यशोदेच्या मायेचा अनोखा संगम!

कुटुंबाचा आधार, संस्कारांची शिदोरी आणि संघर्षातून उभे राहिलेले यशस्वी कुटुंब यांचा सुंदर संगम म्हणजे द्रौपदी आसराजी अडसूळ आणि डॉ. रमाताई अडसूळ या दोन मातांचे जीवन. त्याग, कष्ट, काटकसर, स्वयंशिस्त आणि माणुसकीच्या मूल्यांची जपणूक करत दोन कुटुंबांना घडविणाऱ्या या मातांच्या सन्मानार्थ आयोजित अमृत महोत्सव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या जीवनप्रवासातील आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

या सोहळ्याचे प्रास्ताविक मुलगा प्रा. अविनाश अडसूळ यांनी केले. द्रौपदीताई आणि रमाताई यांच्या रूपाने आम्हाला देवकी आणि यशोदा अशा दोन माता लाभल्या, ही आमच्या कुटुंबासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. वेळेचे महत्त्व, स्वावलंबन, शिस्त आणि आर्थिक नियोजन हे जीवनाचे महत्त्वाचे धडे त्यांनी दिले. वेळेचे काटेकोर पालन करणाऱ्या द्रौपदीताई शाळेत कधीही उशिरा पोहोचल्या नाहीत. लहानपणापासूनच मुलांना स्वावलंबी बनविण्याचे संस्कार त्यांनी केले. त्यांच्या नियोजनबद्ध जीवनशैलीचा फायदा आजही कुटुंबाला होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

माधुरी अडसूळ यांनी आपल्या मनोगतात सासू म्हणून आईची माया मिळाल्याचे सांगितले. काटकसर, स्वयंशिस्त आणि जबाबदारीने जीवन जगण्याचे संस्कार दोन्ही मातांकडून मिळाले. दोन्ही मातांनी मुलांना योग्य संस्कार देत अधिकारी बनविले. भविष्यात याच उत्साहात शतकमहोत्सव साजरा करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.दीपिका अडसूळ यांनी घरातील संस्कार आणि कुटुंबातील एकोपा यांचे श्रेय दोन्ही मातांना दिले.

अमित चिंतामणी यांनी द्रौपदीताईंचे जामखेड परिसरातील अनेकांना मार्गदर्शन लाभले असून त्यांनी अनेकांना योग्य संस्कार दिल्याचे सांगितले. केंद्रप्रमुख राम निकम यांनी धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव केला. वकील संघाचे तालुकाध्यक्ष ॲड. हर्षल डोके यांनी राळेभात आणि अडसूळ ही संघर्षातून घडलेली यशस्वी कुटुंबे असल्याचे सांगितले. माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी अमृत महोत्सव हा जामखेडकरांसमोर एक आदर्श असल्याचे नमूद केले. दोन जावा बहिणीप्रमाणे प्रेमाने आणि एकोप्याने राहिल्या, हाच या कुटुंबाचा खरा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. मधुकर राळेभात यांनी द्रौपदीताईंनी आपल्या कर्तृत्वाने समाजात वेगळा ठसा उमटविल्याचे सांगितले. सून आपल्या सासूचे मनापासून कौतुक करते, त्या घरात आनंद आणि संस्कारांची परंपरा किती समृद्ध आहे, हे यातून दिसते. द्रौपदीताई आणि रमाताई ही अडसूळ व राळेभात कुटुंबीयांना लाभलेली दोन विद्यापीठे आहेत, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला.

अमृत महोत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड
वाढदिवसाचा आनंद केवळ कौटुंबिक सोहळ्यापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रमही यावेळी राबविण्यात आला. साकत येथील शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम जाहीर करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, या उद्देशाने शाळेला वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला. या उपक्रमातून शिक्षण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधोरेखित झाली.

कार्यक्रमात सई राळेभात, मनोज कुलकर्णी आणि ज्योती जावळे यांनीही मनोगत व्यक्त केले. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘खेळ पैठणीचा’ तसेच विविध मनोरंजक फनी गेम्समुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्यास न्यायाधीश सत्यवान डोके, प्रा. मधुकर राळेभात, डॉ. रमाताई अडसूळ, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, अमित चिंतामणी, सभापती श्रीराम डोके, आश्रु शेळके, ॲड. प्रविण सानप, वकील संघाचे तालुकाध्यक्ष ॲड. हर्षल डोके, मनोज कुलकर्णी, पत्रकार नासीर पठाण, सुदाम वराट, गौतम उतेकर, केंद्रप्रमुख राम निकम, आषिश अडसूळ, महेश राळेभात, केदार रसाळ, प्रदीप टाफरे, प्रा. सतीश डुचे, विवेक राळेभात, डॉ. विष्णू राळेभात, अविनाश अडसूळ, गोरख घनवट, दीपिका अडसूळ, माधुरी अडसूळ, अनंता राळेभात, विशाल गोलेकर, शिवाजी लटपटे, ज्योती जावळे यांच्यासह अडसूळ व राळेभात परिवारातील सदस्य आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत महाराज निकम यांनी केले, तर आभार आशीष अडसूळ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!