अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून जोरदार हालचाली सुरू असतानाच चौंडी येथे घडलेल्या एका राजकीय भेटीने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली. तब्बल दीड तास चाललेल्या या भेटीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात राजकीय ताकद पणाला लावणारे दोन दिग्गज नेते अचानक एकाच टेबलावर आल्याने या भेटीचे नेमके राजकीय प्रयोजन काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिवाळीच्या शुभेच्छा अन् राजकीय चर्चांना सुरुवात! वरवर पाहता ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि सदिच्छा व्यक्त करण्यासाठी होती. विखे पाटील यांनी प्रा. राम शिंदे यांच्या मातोश्रींच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. त्यांना लवकर बरे वाटावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.मात्र, या सदिच्छा भेटीला तब्बल दीड तासांचा कालावधी लागल्याने राजकीय चर्चांना वेगळेच वळण मिळाले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील संघर्षानंतर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
विखेंची एकत्र येण्याची साद; शिंदेंचा ताकदीचा प्रत्युत्तरात्मक सूर! जिल्हा बँकेच्या राजकारणात झालेला संघर्ष विसरून जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची भूमिका विखे पाटील यांनी मांडल्याची चर्चा आहे. ‘जे झालं ते झालं, आता एकत्र येऊन जिल्ह्याच्या विकासासाठी काम करूया,’ असा निरोप या भेटीतून दिल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे, प्रा. राम शिंदे यांनीही आपल्या राजकीय ताकदीची जाणीव करून देणारी भूमिका मांडल्याची चर्चा आहे. ‘त्यावेळी बहुदा त्यांना माझी ताकद माहीत नसेल. आता जनतेने निर्णय दिला आहे,’ अशा आशयाच्या त्यांच्या प्रतिक्रियेची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.या चर्चांना अधिकृत दुजोरा नसला, तरी या भेटीमुळे विखे-शिंदे संबंधांमध्ये नवे पर्व सुरू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेच्या खुर्चीवरूनच नवी राजकीय जुळवाजुळव? अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या राजकारणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीत विखे-थोरात गटाचे वर्चस्व दिसून आले असले, तरी प्रा. राम शिंदे यांची राजकीय ताकद आणि त्यांच्यामागील समर्थकांची भूमिका दुर्लक्षित करता येणार नाही.
त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी झालेली ही भेट केवळ सदिच्छा भेट होती की आगामी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. जिल्हा बँकेच्या सत्ताकारणात या भेटीचे पडसाद उमटणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दुष्काळ, पाणीटंचाई आणि विकासकामांचाही विषय! जामखेड-कर्जत तालुक्यांतील भीषण दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी आणि प्रलंबित विकासकामे या विषयांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या जामखेड तालुक्यात पाणीप्रश्न गंभीर बनला असून नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांची ही भेट जामखेडकरांसाठीही महत्त्वाची मानली जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विखे चौंडीत; योगायोग की राजकीय संकेत? विशेष म्हणजे, या भेटीच्या आदल्या दिवशीच प्रा. राम शिंदे यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर अवघ्या २४ तासांत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौंडी गाठल्याने या घडामोडींकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे.
या भेटीमागे वरिष्ठ पातळीवरील राजकीय संवाद आहे का, की जिल्ह्यातील बदलत्या परिस्थितीचा हा परिणाम आहे, याबाबत सध्या केवळ चर्चा सुरू आहे. आता लक्ष जिल्हा बँकेच्या निवडीकडे! चौंडीतील दीड तासांच्या भेटीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. विखे-शिंदे यांच्यात खरोखरच मनोमिलन झाले का? जिल्हा बँकेच्या सत्ताकारणासाठी नवी तडजोड होणार का? की दोन्ही नेते आपापली राजकीय ताकद कायम ठेवत स्वतंत्र वाटचाल करणार? या प्रश्नांची उत्तरे आगामी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीतूनच मिळण्याची शक्यता आहे. मात्र, चौंडीतील या भेटीने अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा नक्कीच सुरू केली आहे!