Friday, November 6, 2026
Home ताज्या बातम्या दुष्काळात पशुपालकांना मोठा आधार! जामखेडमध्ये ६५०० किलो चारा बियाणे अनुदानावर; ज्वारी-मका मोफत...

दुष्काळात पशुपालकांना मोठा आधार! जामखेडमध्ये ६५०० किलो चारा बियाणे अनुदानावर; ज्वारी-मका मोफत वाटप, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य!

0
5
दुष्काळात पशुपालकांना मोठा आधार! जामखेडमध्ये ६५०० किलो चारा बियाणे अनुदानावर; ज्वारी-मका मोफत वाटप, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य!

जामखेड न्युज – – – – – 

दुष्काळात पशुपालकांना मोठा आधार!

जामखेडमध्ये ६५०० किलो चारा बियाणे अनुदानावर, ज्वारी-मका मोफत वाटप, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य!

तालुक्यातील दुष्काळी व टंचाईच्या परिस्थितीत पशुपालकांना मोठा दिलासा देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२६-२७ अंतर्गत जामखेड तालुक्यात ५००० किलो मका आणि १५०० किलो ज्वारी असे एकूण ६५०० किलो चारा बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.


विशेष म्हणजे पात्र शेतकरी व पशुपालकांना हे बियाणे १०० टक्के अनुदानावर मोफत वितरित करण्यात येणार आहे. कमी पाण्यावर येणाऱ्या चारा पिकांची लागवड करून जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध व्हावा, हा या योजनेचा उद्देश आहे.


मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आणि रब्बी हंगामात चारा पिकासाठी पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज, ओळखपत्र, सातबारा उतारा, रेशन कार्ड, हमीपत्र आदी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा.


गावाच्या कार्यक्षेत्रानुसार पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षक यांच्याकडे अर्ज करता येणार आहे. उपलब्ध बियाण्याचे वाटप प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर होणार असल्याने पात्र पशुपालकांनी तातडीने संपर्क साधावा.


दरम्यान, शासनाने वाळलेल्या अर्थात सुक्या चाऱ्याचा दर १२ रुपये प्रति किलो, तर मुरघासाचा दर ८ रुपये प्रति किलो निश्चित केला आहे.

दुष्काळी परिस्थितीत पशुधन जगविण्यासाठी चारा उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांनी या मोफत बियाणे वाटप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जामखेड डॉ. दत्ता मोटेगावकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!