जामखेड न्युज – – – – –
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली! चौंडीत विखे पाटील–राम शिंदे यांची बंद दाराआड चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
अध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यासाठी खलबते? फडणवीसांच्या भेटीनंतर विखे पाटील थेट चौंडीत, जिल्हा बँकेच्या सत्तेचे गणित चर्चेत!

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली असतानाच विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चौंडी येथील भेटीने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दुपारी चौंडी येथे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, कालच सभापती प्रा. राम शिंदे यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री विखे पाटील यांनी चौंडी गाठल्याने या भेटीला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी सुरू असलेली रस्सीखेच, विविध नेत्यांची भूमिका आणि संभाव्य राजकीय समीकरणे यावर या भेटीत चर्चा झाली असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी नेत्यांमधील या भेटीगाठींमुळे उत्सुकता अधिकच वाढली आहे.


