Tuesday, October 20, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडच्या सिद्धार्थनगरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा! बुद्धवंदना, दीपप्रज्वलन...

जामखेडच्या सिद्धार्थनगरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा! बुद्धवंदना, दीपप्रज्वलन अन् डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; अपूर्ण बुद्धविहाराचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी

0
2
जामखेडच्या सिद्धार्थनगरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा!  बुद्धवंदना, दीपप्रज्वलन अन् डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; अपूर्ण बुद्धविहाराचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेडच्या सिद्धार्थनगरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा!

बुद्धवंदना, दीपप्रज्वलन अन् डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; अपूर्ण बुद्धविहाराचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी

जामखेड शहरातील सिद्धार्थनगर येथे महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून, सामुदायिक बुद्धवंदना आणि दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित बौद्ध बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून धम्मविचारांचा जागर केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. याच परंपरेनुसार सिद्धार्थनगर येथेही हा दिवस श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक एकतेच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

अपूर्ण बुद्धविहारामुळे मोठ्या कार्यक्रमाला मर्यादा!
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी बाजारतळ परिसरातील बुद्धविहाराच्या अपूर्ण बांधकामाचा प्रश्न उपस्थित केला. बुद्धविहाराचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून व्यापक स्वरूपात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. संबंधित बुद्धविहाराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून ते बौद्ध बांधवांसाठी खुले करण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पुढील वर्षी भव्य धम्मरॅली काढण्याचा निर्धार!
भारतीय बौद्ध महासभेच्या सौ. सुरेखा सदाफुले यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार अधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त केली. पुढील वर्षी मोठ्या स्वरूपात धम्मरॅली काढून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ज्येष्ठ बाळासाहेब सदाफुले आणि उषाबाई सदाफुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सामुदायिक बुद्धवंदना, अभिवादन आणि धम्मविचारांच्या स्मरणातून कार्यक्रमाला आध्यात्मिक व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले.

समाजबांधवांची उपस्थिती
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, सचिन सदाफुले, बाळासाहेब सदाफुले, प्रमोद सदाफुले, संजय घायतडक, अशोक घायतडक, मिलिंद भोसले, कल्याण काळे, रोहित सदाफुले, हौसराव घायतडक, शेखर घायतडक, भारतीय बौद्ध महासभेच्या सौ. सुरेखा सदाफुले, शैला सदाफुले, नंदा सदाफुले, अल्का राजगुरू, बेबीताई गायकवाड, उषाबाई सदाफुले, शालनबाई घायतडक, बेबी सदाफुले, मैनाबाई सदाफुले यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. तसेच बुद्धविहाराचे अपूर्ण बांधकाम पूर्ण झाल्यास भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात धम्मविषयक कार्यक्रम आयोजित करता येतील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!