Home शैक्षणिक बातम्या शिक्षक द्या, पाचवीचा वर्ग सुरू करा! मागण्या दुर्लक्षित होताच, शाळेला पालकांनी ठोकले...

शिक्षक द्या, पाचवीचा वर्ग सुरू करा! मागण्या दुर्लक्षित होताच, शाळेला पालकांनी ठोकले कुलूप

0
3
शिक्षक द्या, पाचवीचा वर्ग सुरू करा! मागण्या दुर्लक्षित होताच, शाळेला पालकांनी ठोकले कुलूप

जामखेड न्युज – – – – – 

शिक्षक द्या, पाचवीचा वर्ग सुरू करा! मागण्या दुर्लक्षित होताच, शाळेला पालकांनी ठोकले कुलूप

जामखेड तालुक्यातील बांधखडक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चव्हाणवस्ती येथे शिक्षकाची तात्पुरती नियुक्ती रद्द करून मूळ शिक्षक पुन्हा शाळेत पाठवावा, तसेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यास मंजुरी द्यावी, या मागणीसाठी संतप्त पालक व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. प्रशासनाकडून वारंवार मागणी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

चव्हाणवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सध्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील उपशिक्षक विकास मधुकर सौने यांची गेल्या तीन महिन्यांपासून तात्पुरत्या स्वरूपात अन्य शाळेत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेतील उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा भार पडत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून शाळेत इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सचिव तसेच ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही सादर करण्यात आला होता. मात्र, प्रस्तावावर अद्याप निर्णय न झाल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

शिक्षकाची पूर्ववत नियुक्ती करावी आणि पाचवीचा वर्ग सुरू करण्यास मंजुरी द्यावी, यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते.मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, दिलेल्या मुदतीत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी अखेर शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला.

यावेळी योगेश चव्हाण, हरीदास चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, संकेत उवाळे, संतोष चव्हाण, गोकुळ चव्हाण, विजय खाडे, मच्छिंद्र चव्हाण, अंकुश चव्हाण, अर्जुन कुटे, राजेंद्र कुटे, कांतीलाल चव्हाण, महादेव चव्हाण यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शिक्षक नसल्याने मुलांचे शिक्षण विस्कळीत झाले आहे. पाचवीचा वर्ग सुरू करण्याची मागणी करूनही शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत शाळा सुरू करू देणार नाही,” असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव चव्हाण यांनी दिला.

दरम्यान, “शिक्षकाची मागणी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे गेलो असता विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अशी विनंती केली. मात्र, विद्यार्थी पटसंख्या कमी असल्याने शिक्षक देता येणार नाही, असे सांगण्यात आले. तसेच गुन्हे दाखल करण्याची भाषा करण्यात आली,” असा आरोप बांधखडक ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र कुटे यांनी केला.

शाळेतील शिक्षकाची तात्पुरती नियुक्ती रद्द करून मूळ शिक्षक पूर्ववत देणे आणि पाचवीचा वर्ग सुरू करण्याच्या मागणीवर शिक्षण विभाग आता कोणती भूमिका घेतो, याकडे पालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!