“चोरीचा गुन्हा की पोलिसांचा हलगर्जीपणा?”, ५ महिन्यांच्या जुळ्या बाळांसह आईचा महामार्गावर ठिय्या! नान्नजमध्ये तीन तास रास्ता रोको, पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
५ महिन्यांच्या जुळ्या बाळांसह आईचा महामार्गावर ठिय्या! नान्नजमध्ये तीन तास रास्ता रोको, पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
नान्नज (ता. जामखेड) येथे मनीषा श्रीमंत गोरे यांच्या घरात झालेल्या तब्बल १४ लाख ६३ हजार रुपयांच्या जबरी चोरीप्रकरणी पोलिसांनी योग्य तपास न करता चुकीच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप करत पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी शनिवारी (दि. ३ ऑक्टोबर) जामखेड-करमाळा राज्यमार्गावर तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. विशेष म्हणजे, आंदोलनात मनीषा गोरे या आपल्या पाच महिन्यांच्या जुळ्या बाळांसह सहभागी झाल्या, त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
मनीषा गोरे यांच्या घरात शुक्रवारी (दि. २ ऑक्टोबर) रात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १४ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर गोरे यांनी जामखेड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांनी तक्रारीची योग्य दखल घेतली नाही आणि घाईगडबडीत चुकीच्या कलमांनुसार ऑनलाइन एफआयआर नोंदवून घेतल्याचा आरोप गोरे कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी आपल्याला मानसिक त्रास दिला तसेच तक्रारीतील माहितीबाबत दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला. “सहा जण होते, मग गुन्ह्यात चारच आरोपी का?”
रास्ता रोको आंदोलनादरम्यान मनीषा गोरे यांनी पोलिसांच्या तपास पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या वेळी सहा दरोडेखोर उपस्थित असल्याचे त्यांनी पोलिसांना स्पष्ट सांगितले होते. मात्र, गुन्ह्यात केवळ चार आरोपी दाखवण्यात आले, असा त्यांचा आरोप आहे.
तसेच, “तुमचे सोने कमी गेले आहे, तुम्ही जास्त का सांगता?” आणि “तुमच्याकडे एवढे सोने आले कुठून?” अशा प्रकारचे प्रश्न पोलिसांकडून विचारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे आपल्यावर दबाव आणून मानसिक त्रास दिल्याचा आरोप त्यांनी आंदोलनादरम्यान केला. माजी सरपंचांचा पोलिसांना सवाल; ‘पोलिसांचे साटेलोटे तर नाही ना?’ नान्नजचे माजी सरपंच संतोष पवार यांनीही आंदोलनाला संबोधित करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. घटना गंभीर असताना दरोड्याचे योग्य कलम लावले गेले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
घटनेच्या दिवशी दुपारी चार ते सहा या वेळेत पोलीस ठाण्यात एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याचा दावा करत, “या गंभीर घटनेकडे पोलिसांचे दुर्लक्ष का झाले? या प्रकरणात पोलिसांचे साटेलोटे तर नाही ना?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मात्र, हा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला असून त्याबाबत स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.
तीन तास महामार्ग ठप्प पोलिसांच्या कारभाराविरोधात संतप्त झालेल्या गोरे कुटुंबीयांसह नान्नज ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी सुमारे ९ वाजता गोरे यांच्या घरासमोर जामखेड-करमाळा राज्यमार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. पोलिसांचे लेखी आश्वासन; तपास एपीआय अजित मोरे यांच्याकडे आंदोलकांच्या मागण्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून, या गुन्ह्याचा तपास आपण स्वतः करणार असल्याचे एपीआय अजित मोरे यांनी सांगितले. सर्व आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
पोलिसांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर गोरे कुटुंबीय व ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले आणि महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. या आंदोलनाला नान्नज व्यापारी असोसिएशनसह ग्रामस्थांनी गोरे कुटुंबीयांना पाठिंबा दिला. आता पोलिसांच्या लेखी आश्वासनानुसार या दरोडा प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि प्रत्यक्षात किती आरोपी निष्पन्न होतात, याकडे नान्नज ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.