प्रांताधिकाऱ्यांनी हातात घेतला झाडू, आता जामखेडचे अधिकारीही आदर्श घेणार का?
अधिकारी असावा तर असा! स्वच्छता दिनी कृतीतून दिला स्वच्छतेचा संदेश
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्वच्छता दिनाचे औचित्य साधून जामखेडचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी स्वतः हातात झाडू-खराटा घेत कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. वरिष्ठ अधिकारी स्वतः स्वच्छतेसाठी मैदानात उतरल्याचे पाहून कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह निर्माण झाला आणि सर्वांनी स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यालय परिसरात वाढलेले अनावश्यक गवत, कचरा तसेच अस्वच्छ ठिकाणे स्वच्छ करण्यासाठी प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी स्वतः पुढाकार घेतला. केवळ सूचना देण्याऐवजी अधिकारी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता करत असल्याचे दृश्य कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.
प्रांताधिकारी पाटील यांच्या पुढाकारानंतर कार्यालयातील कर्मचारीही स्वच्छतेसाठी सरसावले. सर्वांनी मिळून कार्यालय परिसरातील अनावश्यक गवत काढून कचरा साफ केला. त्यामुळे काही वेळातच कार्यालय परिसराचा कायापालट झाल्याचे पाहायला मिळाले.
महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला विशेष महत्त्व दिले होते. स्वच्छ भारताचा संदेश केवळ भाषणातून न देता तो प्रत्यक्ष कृतीतून अंगीकारणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरते. याच विचाराला कृतीची जोड देत प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी स्वच्छता दिनी दिलेला संदेश नागरिकांसह शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरला.
‘स्वच्छता ही केवळ कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे,’ हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला. वरिष्ठ अधिकारी स्वतः कामात सहभागी झाल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्येही सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या या कृतीचे परिसरात कौतुक होत असून, अधिकारी स्वतः मैदानात उतरला तर कर्मचारीही निश्चितच प्रेरित होतात, याचा प्रत्यय राष्ट्रीय स्वच्छता दिनाच्या निमित्ताने आला.