जामखेड न्युज – – – – –
रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत-जामखेडमध्ये रोजगाराची ‘संधी’!
२ व ३ ऑक्टोबरला भव्य रोजगार मेळावा, तरुण-तरुणींना थेट मुलाखतीतून नोकरीची संधी

कर्जत-जामखेड मतदारसंघातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आ. रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती ॲग्रो लिमिटेड आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग यांच्या सहकार्याने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

स्थानिक युवकांना रोजगाराच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात विविध औद्योगिक क्षेत्रांतील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यामुळे कर्जत-जामखेड परिसरातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या रोजगार मेळाव्याचे आयोजन कर्जत येथे शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत दादा पाटील महाविद्यालयात करण्यात आले आहे. त्यानंतर जामखेड येथे शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत नागेश विद्यालय व कन्या विद्यालय येथे रोजगार मेळावा होणार आहे.

या मेळाव्यात दहावी, बारावी उत्तीर्ण, कोणत्याही ट्रेडमधील आयटीआय, विविध पदविका अभ्यासक्रम तसेच B.Sc., B.Com. आणि B.A. पदवीधारक उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगार व नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी हा मेळावा रोजगाराची नवी दारे खुली करणारा ठरणार आहे.




