Tuesday, September 29, 2026
Home ताज्या बातम्या दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या बळीराजासाठी शिवसेना मैदानात! जामखेडमध्ये ‘शेतकरी मदत केंद्र’ सुरू ...

दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या बळीराजासाठी शिवसेना मैदानात! जामखेडमध्ये ‘शेतकरी मदत केंद्र’ सुरू ७२ पेक्षाही परिस्थिती अधिक गंभीर’ — राजेंद्र दळवी

0
2
दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या बळीराजासाठी शिवसेना मैदानात! जामखेडमध्ये ‘शेतकरी मदत केंद्र’ सुरू   ७२ पेक्षाही परिस्थिती अधिक गंभीर’ — राजेंद्र दळवी

जामखेड न्युज – – – – – – 

दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या बळीराजासाठी शिवसेना मैदानात!
जामखेडमध्ये ‘शेतकरी मदत केंद्र’ सुरू

७२ पेक्षाही परिस्थिती अधिक गंभीर’ — राजेंद्र दळवी

 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जामखेड येथे ‘शेतकरी मदत केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यात या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी दिली.

सध्या जामखेड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत चालली असून शेतकऱ्यांसमोर पाणी, चारा, पीक नुकसान आणि आर्थिक अडचणींचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती मिळावी, विविध योजनांचे अर्ज भरताना अडचणी येऊ नयेत आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळावा, यासाठी हे मदत केंद्र कार्यरत राहणार आहे.

मदत केंद्रातून कोणत्या सुविधा मिळणार?
या केंद्रामध्ये शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांसंदर्भात मोफत मार्गदर्शन व अर्ज प्रक्रियेसाठी मदत केली जाणार आहे. त्यामध्ये —
पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यास मदत
कर्जमाफीसंदर्भात मार्गदर्शन
अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाईसाठी अर्ज प्रक्रिया
७/१२, ८-अ, फेरफार आदी महसूल विषयक कामांसाठी मार्गदर्शन
पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची माहिती
जनावरांच्या विम्याबाबत मार्गदर्शन
शेती अवजारे व विविध कृषी योजनांवरील अनुदानाची माहिती
पाणी व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासकीय मदतीसाठी पाठपुरावा
यांचा समावेश आहे.

‘७२ पेक्षाही परिस्थिती अधिक गंभीर’ — राजेंद्र दळवी
यावेळी शिवसेना अहिल्यानगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी जामखेड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्याचा दुष्काळ हा १९७२ च्या दुष्काळापेक्षाही अधिक कठीण असल्याचे शेतकऱ्यांना जाणवत आहे. त्या काळात लोकसंख्या आणि पशुधन तुलनेने कमी होते; मात्र आज लोकसंख्या वाढली असून पशुधनाची संख्याही मोठी आहे. शेतीचे क्षेत्र तुलनेने तेवढेच असताना पाणी आणि चाऱ्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात पाणी व चारा टंचाईचे संकट अधिक गंभीर होऊ शकते.

 

शेतकऱ्यांना कर्जमाफीसह पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि इतर आवश्यक शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल, असे दळवी यांनी सांगितले.
‘शेतकरी आणि शासन यांच्यातील दुवा’ म्हणून केंद्राचे काम
अनेक शेतकरी केवळ योजनांची माहिती नसल्यामुळे किंवा अर्ज प्रक्रियेतील अडचणींमुळे शासकीय योजनांपासून वंचित राहतात. ही अडचण दूर करण्यासाठी शेतकरी मदत केंद्र शेतकरी आणि शासन यांच्यातील दुवा म्हणून काम करणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आगामी काळात तालुका आणि जिल्हास्तरावर तसेच गावोगावी या उपक्रमाचा विस्तार करण्याचा मानस असून, शिवसेनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व मदत करतील, असेही यावेळी सांगण्यात आले.

जामखेड येथील शेतकरी मदत केंद्राच्या उपक्रमावेळी शिवसेना अहिल्यानगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख रामदास गोल्हार, तालुकाप्रमुख ॲड. मयुर डोके, शहरप्रमुख प्रवीण मगर, शहाजी काका राळेभात, प्रा. धनंजय भोसले, संदीप गायकवाड, विधानसभा संघटक गणेश उगले, संजय डोके, संदीप राळेभात, विनोद नंदीरे, बाजीराव डोके, अविनाश डोके, परशुराम रेडे, भैया मगर, तालुका मीडिया प्रमुख भारत पवार, अविनाश गायकवाड, सतीश कदम, पंडित ढवळे, सिद्धेश्वर गुरव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या शिवसेना शाखेशी संपर्क साधून शेतकरी मदत केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!