Tuesday, September 22, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड शहरातील पथदिवे बंद, बॅनरबाजी सुरूच! पोल लाईटसाठी की बॅनरसाठी?, बॅनर बाजी...

जामखेड शहरातील पथदिवे बंद, बॅनरबाजी सुरूच! पोल लाईटसाठी की बॅनरसाठी?, बॅनर बाजी मुळे अपघातात वाढ

0
2
जामखेड शहरातील पथदिवे बंद, बॅनरबाजी सुरूच! पोल लाईटसाठी की बॅनरसाठी?, बॅनर बाजी मुळे अपघातात वाढ

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेड शहरातील पथदिवे बंद, बॅनरबाजी सुरूच! पोल लाईटसाठी की बॅनरसाठी?, बॅनर बाजी मुळे अपघातात वाढ

जामखेड शहरातील पंचदेवालय ते नवले पेट्रोल पंप या राष्ट्रीय महामार्गावरील मार्गाच्या मध्यभागी सुमारे महिनाभरापूर्वी पथदिव्यांसाठी लोखंडी पोल उभारण्यात आले. या पोलवरील दिव्यांचे टेस्टिंगही करण्यात आले. त्यामुळे रात्रीच्या वेळी हा मार्ग प्रकाशमान होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा जामखेडकरांनी व्यक्त केली होती. मात्र, टेस्टिंग होऊन महिना उलटला तरी अद्याप या पोलवरील दिवे नियमितपणे सुरू झालेले नाहीत. मात्र पोलवरील बॅनर मुळे अपघाताची संख्या वाढली आहे.

परिणामी, दिव्यांसाठी उभारलेले पोल उभे आहेत; मात्र रात्रीचा रस्ता अंधारातच आहे. विशेष म्हणजे या पोलचा वापर सध्या शुभेच्छा बॅनर लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. एक बॅनर काढला की त्याच ठिकाणी दुसरा बॅनर झळकत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

पोलवर बॅनरची गर्दी, पण रस्त्यावर अंधार!
शहराच्या मुख्य मार्गावर उभारलेल्या जवळपास प्रत्येक पोलवर विविध प्रकारचे शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्येही प्रश्न उपस्थित होत आहे की, हे पोल पथदिव्यांसाठी उभारले आहेत की बॅनर लावण्यासाठी?
रात्रीच्या वेळी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. शहराच्या प्रवेशमार्गावरच पुरेसा प्रकाश नसल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पथदिवे सुरू झाल्यास या मार्गावर सुरक्षितता वाढण्यास मदत होऊ शकते. मात्र, महिनाभरापासून दिवे बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

टेस्टिंग झाले, मग प्रत्यक्ष प्रकाश कधी?
पथदिव्यांचे टेस्टिंग झाले असल्याने यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी नेमकी अडचण काय आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विद्युत जोडणी, तांत्रिक अडचण किंवा अन्य कोणते कारण असल्यास संबंधित विभागाने ते स्पष्ट करावे आणि तातडीने दिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

अधिकारी-पदाधिकारी नेमके गप्प का?
शहरातील नागरिकांच्या दैनंदिन सुरक्षेशी संबंधित असलेल्या या प्रश्नाकडे संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महिनाभरापासून पथदिवे बंद असताना याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही का झाली नाही? असा सवाल नागरिक करत आहेत.

राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी उभारण्यात आलेले हे पोल केवळ बॅनर लावण्यासाठी नसून नागरिकांना रात्रीच्या वेळी सुरक्षित आणि प्रकाशमान मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणेने तातडीने पाहणी करून पंचदेवालय ते नवले पेट्रोल पंप या मार्गावरील सर्व पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी जामखेडकरांकडून होत आहे.

दिव्यांच्या प्रतीक्षेत जामखेडकर आणि बॅनरच्या गर्दीत पथदिव्यांचे पोल—या विसंगतीकडे प्रशासन आता तरी गांभीर्याने पाहणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!