गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीला ‘नो एंट्री’, जामखेड पोलिसांचा मंडळांना सज्जड इशारा! शांतता समितीच्या बैठकीत पारंपरिक वाद्यांवर भर, ६० ते ७० मंडळ पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती
शांतता समितीच्या बैठकीत पारंपरिक वाद्यांवर भर, ६० ते ७० मंडळ पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती
गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत पार पाडण्यासाठी जामखेड पोलिसांकडून नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत जामखेड पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच बेंजो, डीजे मालक व चालक उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सवातील मिरवणुका आणि विसर्जन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून विविध सूचना देण्यात आल्या.
विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांवर भर विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, अशा स्पष्ट सूचना बैठकीत देण्यात आल्या. डीजे व डॉल्बीचा वापर करू नये, असे पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले. अहिल्यानगर जिल्ह्यात गणेशोत्सव काळात डॉल्बी साउंड सिस्टिम व उच्च आवाजाच्या ध्वनीवर्धकांवर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत.
गणेशोत्सव हा आनंदाचा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
‘अमली पदार्थमुक्त समाज’ जनजागृतीचा संदेश बैठकीदरम्यान गणेश मंडळांना अमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी बोर्ड देण्यात आले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सामाजिक संदेश पोहोचविण्यासाठी मंडळांनी या जनजागृती उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
६० ते ७० पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती या शांतता समितीच्या बैठकीस गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, बेंजो मालक, डीजे मालक-चालक तसेच शांतता समितीचे सदस्य अशा सुमारे ६० ते ७० जणांची उपस्थिती होती.
गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सर्व मंडळांनी नियमांचे पालन करावे आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांसह उत्साह, मात्र डीजे-डॉल्बीला आळा, असे चित्र जामखेडमध्ये पाहायला मिळणार आहे.