जामखेड न्युज – – – – – –
साकत परिसरात दुष्काळाची दाहकता, पिके करपली, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण!
करपलेल्या सोयाबीनचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्या, चारा छावण्या व पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी

जामखेड तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तालुक्यातील साकत परिसरात पावसाअभावी शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनसह खरीप पिके करपून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दुसरीकडे गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला असून, नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा वणवण भटकावे लागत आहे.

तालुक्यातील साकत परिसर सोयाबीन चे कोठार म्हणून समजले जाते मात्र यंदा
साकत परिसरात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सुरुवातीला पिके जोमात आली असली तरी त्यानंतर पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला. परिणामी सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या काळातच पिकांना पाण्याची कमतरता जाणवू लागली. अनेक ठिकाणी सोयाबीन अक्षरशः करपून गेले असून शेतकऱ्यांच्या हातात उत्पादनाऐवजी मोठे नुकसान येण्याची भीती निर्माण झाली आहे.

पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी
साकत परिसरातील करपलेल्या सोयाबीन व इतर खरीप पिकांचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत. प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी करून शासनाच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पिकांवर झालेल्या खर्चाची भरपाईही निघण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांसमोर पुढील हंगामाचे आर्थिक नियोजन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर
पावसाअभावी परिसरातील पाणीसाठे आटत चालले असून विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून साकत परिसरातील गरजू गावांमध्ये तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.




