जामखेडच्या रस्त्यावर पुन्हा मराठा शक्तीचा एल्गार! १६ सप्टेंबरला मनोज जरांगे पाटलांचा मुंबईकडे कूच, लाखोंच्या गर्दीने जामखेड दणाणणार
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षाची भूमिका घेतलेले संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे येत्या १६ सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना होणार असून, त्यांच्या मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर जामखेड शहरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जामखेड शहर व परिसरातील मराठा समाजाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणासाठी जाणार असल्याने त्यांच्या या प्रवासाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यांच्या मुंबईकडे जाणाऱ्या मार्गातील जामखेड हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याने शहरात मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाणाऱ्या नियोजित प्रवासात पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा, दुसरा मुक्काम श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर), तिसरा मुक्काम हडपसर (पुणे) आणि चौथा मुक्काम खोपोली येथे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर पाचव्या दिवशी ते मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर जामखेड शहरातून जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहावेत, यासाठी समाजबांधवांमध्ये जनजागृती सुरू झाली आहे. विविध ठिकाणी स्वागताची तयारी करण्याबाबत नियोजन केले जात असून, मार्गावर शिस्त व शांतता राखण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
“पाटील यांच्या स्वागतासाठी लागा तयारीला”, असे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत असून, १६ सप्टेंबर रोजी जामखेड शहरात मोठ्या संख्येने समाजबांधव एकत्र येण्याची शक्यता आहे.
जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे होणाऱ्या या प्रवासामुळे जामखेडमध्ये मराठा समाजाची मोठी उपस्थिती पाहायला मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.