जामखेडमध्ये ऐतिहासिक बंद! मराठा आरक्षणाला मुस्लिम समाजाची भक्कम साथ, जरांगे पाटलांच्या लढ्याला ताकद
मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी जामखेड शहर व तालुक्यात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या बंदच्या आवाहनाला व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत आपली दुकाने व व्यावसायिक आस्थापने बंद ठेवली.
सकाळपासूनच जामखेड शहरातील प्रमुख बाजारपेठा, व्यापारी प्रतिष्ठाने आणि विविध व्यावसायिक आस्थापना बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे शहरातील नेहमीची वर्दळ कमी झाली असून, बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
यावेळी नगरसेवक वसीम भाई सय्यद यांनी पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणाच्या लढ्याला मुस्लिम समाजाचा पाठिंबा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय्य मागणीला संपूर्ण मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे. आम्ही सर्व मुस्लिम बांधव मराठा समाजासोबत खांद्याला खांदा लावून या लढ्यात सहभागी आहोत. जुन्या अभिलेखांमध्ये कुणबी म्हणून नोंद असलेल्या मुस्लिम बांधवांनाही शासनाच्या नियमानुसार आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी आमची मागणी आहे.
आज जामखेड शहर बंद ठेवण्यात आले असून, या बंदला मुस्लिम समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे. समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात आम्ही एकजुटीने सहभागी आहोत,” असेही नगरसेवक वसीम सय्यद यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते कुंडल राळेभात यांनी आंदोलनाबाबत तीव्र भूमिका व्यक्त केली. ते म्हणाले, “जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षणाचा न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे. शासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आंदोलनाची दिशा अधिक तीव्र केली जाईल.यावेळी त्यांनी सत्ताधारी मंत्री किंवा लोकप्रतिनिधी जामखेडमध्ये आल्यास त्यांच्या वाहनांचा मार्ग अडवून घेराव घालण्याचा इशाराही दिला.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखंड मराठा समाज जामखेड तालुक्याच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला व्यापारी, व्यावसायिक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने व व्यवसाय बंद ठेवले.शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक व ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.या बंदच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातील मराठा समाजाने एकजुटीची ताकद दाखवत आंदोलनाला ठाम पाठिंबा दर्शविला. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल अखंड मराठा समाजाच्या वतीने जामखेडमधील सर्व व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.