Wednesday, September 2, 2026
Home ताज्या बातम्या कैलास महाराजांच्या निस्वार्थ कीर्तनसेवेमुळे वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत – साहेबराव दरेकर ...

कैलास महाराजांच्या निस्वार्थ कीर्तनसेवेमुळे वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत – साहेबराव दरेकर देवदैठणच्या भुईदऱ्यात श्रावणी सोमवारनिमित्त भक्तीचा महासोहळा, अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता

0
2
कैलास महाराजांच्या निस्वार्थ कीर्तनसेवेमुळे वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत – साहेबराव दरेकर   देवदैठणच्या भुईदऱ्यात श्रावणी सोमवारनिमित्त भक्तीचा महासोहळा, अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता

जामखेड न्युज – – – – – 

कैलास महाराजांच्या निस्वार्थ कीर्तनसेवेमुळे वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत – साहेबराव दरेकर

देवदैठणच्या भुईदऱ्यात श्रावणी सोमवारनिमित्त भक्तीचा महासोहळा, अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता

जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील निसर्गरम्य आणि धार्मिक महत्त्व असलेल्या भुईदऱ्यात श्रावणी सोमवारनिमित्त भक्तीचा अनोखा सोहळा रंगला. अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील तसेच विविध गावांतील भाविकांनी मोठी गर्दी केली. हरिनामाचा गजर, भजन-कीर्तन आणि काल्याच्या पंगतीमुळे संपूर्ण भुईदरा परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता.

वारकरी भूषण ह.भ.प. कैलास महाराज भोरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. कीर्तनातून त्यांनी भक्तीबरोबरच सेवा, त्याग, परमार्थ आणि सामाजिक एकोप्याचा संदेश भाविकांना दिला.

कैलास महाराज भोरे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील “याल तरी यारे लागे! आवघे माझ्या मागे मागे!! आजी देतो पोटभरी! पुरे म्हणाल तोवरी!!” या अभंगावर चिंतन मांडले. “मागितल्यापेक्षा जास्त देणे हा देवाचा स्वभाव आहे, तर कमी देणे हा जिवाचा स्वभाव आहे,” असे सांगत त्यांनी माणसाने जीवनात सेवाभाव, त्याग आणि परमार्थाची भावना जोपासण्याचे आवाहन केले. सेवेने परमार्थ वाढतो, त्यामुळे समाजातील प्रत्येकाने परमार्थात सेवाभाव ठेवला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

श्रीकृष्णाच्या बाललीलांचे रसाळ विवेचन
कीर्तनात कैलास महाराजांनी श्रीकृष्णाच्या चरित्राचे निरूपण करताना त्यांच्या बाललीला, गोवर्धन पर्वत उचलण्याची लीला तसेच विविध असुरांचा संहार यांचे रसाळ वर्णन केले. कृष्णभक्तीचे महत्त्व सांगताना त्यांनी विविध अभंग व भक्तिगीतांच्या माध्यमातून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.

श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला, अघासुराशी युद्ध करून त्याचा वध केला आणि गोपाळांसोबत काला केला, या प्रसंगांचे त्यांनी प्रभावी विवेचन केले. त्यांच्या ओघवत्या वाणीने आणि भक्तिरसाने भारावलेल्या वातावरणात भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तीचा आनंद घेतला.

भुईदरा ही ऋषी-मुनींची तपोभूमी
भुईदरा ही पूर्वी ऋषी-मुनींच्या साधनेने पावन झालेली तपोभूमी असल्याचे कैलास महाराजांनी सांगितले. अशा पवित्र ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने मोठा धार्मिक उत्सव पार पडत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

इतर ठिकाणी सप्ताहाच्या सांगतेला महाप्रसादाचे आयोजन केले जाते; मात्र भुईदऱ्यात काल्याच्या पंगतीची अनोखी परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले. विविध गावांतील भाविक भाकरी, भाजी, ठेचा, चटणी, लोणचे तसेच बुंदी, लापशी आदी पदार्थ घेऊन येतात. त्यातून काल्याच्या पंगती पार पडतात. या परंपरेतून भक्तीबरोबरच सामाजिक एकोप्याचे दर्शन घडते.

भुईदरा संस्थानच्या विकासासाठी आणखी प्रयत्नांची गरज
धार्मिक व्यासपीठ सर्वांसाठी खुले असून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने या व्यासपीठावर यावे, त्यांचे स्वागतच केले जाईल, असे कैलास महाराज भोरे यांनी सांगितले.
भुईदरा संस्थानच्या विकासासाठी सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी निधी उपलब्ध करून दिला असून काही विकासकामे झाली आहेत. मात्र, या पवित्र स्थळी अद्याप अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे भुईदरा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी प्रयत्न होणे गरजेचे असल्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

“कैलास महाराजांच्या निस्वार्थ सेवेमुळे वारकरी परंपरा टिकून”
यावेळी आष्टीचे माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी कैलास महाराज भोरे यांच्या कीर्तनसेवेचे कौतुक केले. “कैलास महाराजांसारख्या कीर्तनकारांमुळे वारकरी संप्रदायाची परंपरा टिकून आहे. ते राज्यभर कीर्तनसेवा करतात; मात्र कोणत्याही ठिकाणी पाकीट तर सोडा, साधा नारळही स्वीकारत नाहीत. त्यांच्या निस्वार्थ सेवेची हीच मोठी ओळख आहे,” असे दरेकर म्हणाले.

कैलास महाराजांच्या निस्वार्थ कीर्तनसेवेमुळेच डोंगरमाथ्यावरील भुईदऱ्यात एवढ्या मोठ्या संख्येने भाविक एकत्र आले आहेत, असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संतांच्या विचारांची परंपरा आजही समाजाला एकत्र बांधून ठेवत आहे. भुईदऱ्यातील या धार्मिक सोहळ्यातून त्याचा प्रत्यय येत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
श्रावणी सोमवारनिमित्त सकाळपासूनच भुईदऱ्यात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. हरिनामाचा गजर, भजन-कीर्तन आणि काल्याच्या पंगती यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता भक्ती, सेवा, परमार्थ आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देत उत्साहात झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!