Monday, September 14, 2026
Home ताज्या बातम्या जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे!’, जामखेड तालुक्यात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काळ्या फितीचे आंदोलन ...

जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे!’, जामखेड तालुक्यात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काळ्या फितीचे आंदोलन १ ते ४ सप्टेंबरदरम्यान आंदोलन; विविध माध्यमिक विद्यालयांतील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0
19

जामखेड न्युज – – – – – 

‘जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे!’, जामखेड तालुक्यात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काळ्या फितीचे आंदोलन

१ ते ४ सप्टेंबरदरम्यान आंदोलन; विविध माध्यमिक विद्यालयांतील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अंशतः अनुदानित तसेच त्यानंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या आवाहनानुसार जामखेड तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत काळ्या फिती लावून काम करण्याचे आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील माध्यमिक विद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. ‘मिळू द्या १९८२ ची पेन्शन’, ‘आमची मागणी न्याय हक्कांची’ अशा भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले.

जामखेड शहरातील ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नागेश विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल खर्डा तसेच अरणगाव, साकत, नान्नज, जवळा, पाटोदा, दिघोळ यांसह तालुक्यातील विविध माध्यमिक विद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले.

शासनाच्या सेवेत अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करूनही जुनी पेन्शन योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक जीवन सुरक्षित व्हावे, यासाठी १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे.

काळ्या फिती लावून काम करण्याच्या या आंदोलनातून शासनाने कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. १ ते ४ सप्टेंबरदरम्यान विविध शाळांमध्ये हे आंदोलन सुरू राहणार असून, आपल्या न्याय्य मागणीसाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!