कुकडीला हजारो कोटींची मंजुरी, जामखेड मात्र पाण्याच्या प्रतीक्षेत! कुकडीसोबत कृष्णा-भीमा स्थिरीकरणातूनही तालुका वंचित, ‘जामखेडच्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी कधी?’ — अवधूत पवार
कुकडीला हजारो कोटींची मंजुरी, जामखेड मात्र पाण्याच्या प्रतीक्षेत!
कुकडीसोबत कृष्णा-भीमा स्थिरीकरणातूनही तालुका वंचित, ‘जामखेडच्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी कधी?’ — अवधूत पवार
कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या ₹५,७०४.५० कोटींच्या सुधारित खर्चास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पातून १,४४,९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
रखडलेल्या कामांना गती मिळून दुष्काळी भागातील शेतीला स्थैर्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असतानाच, या जलनियोजनात जामखेड तालुक्याचा समावेश नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कुकडी प्रकल्पाच्या माध्यमातून जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा आदी भागांना पाण्याचा लाभ मिळणार आहे.
मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून कुकडीच्या पाण्याची प्रतीक्षा करणारा दुष्काळी जामखेड तालुका या जलनियोजनापासून वंचितच असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी केला आहे.
कृष्णा-भीमा योजनेतही जामखेडला स्थान नाही कुकडी प्रकल्पाबरोबरच कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेतही जामखेड तालुक्याचा समावेश नसल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे राज्यातील मोठ्या जलप्रकल्पांच्या नियोजनात जामखेडचा विचार नेमका का होत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दक्षिण अहिल्यानगर दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध जलप्रकल्पांचा उपयोग होणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, दक्षिण अहिल्यानगरमधील दुष्काळी तालुका असलेल्या जामखेडपर्यंत हा जलनियोजनाचा लाभ कधी पोहोचणार? असा प्रश्न शेतकरी आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
पाण्याअभावी शेतीसोबत ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही फटका जामखेड तालुक्यात पाण्याची उपलब्धता हा केवळ शेतीपुरता मर्यादित प्रश्न नाही. सिंचनाच्या अभावाचा परिणाम शेती उत्पादन, शेतकऱ्यांचे उत्पन्न, रोजगार, स्थलांतर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहे. कायमस्वरूपी सिंचनाची व्यवस्था निर्माण झाल्यास शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला स्थैर्य मिळू शकते. त्यामुळे जामखेडचा पाणीप्रश्न हा हजारो शेतकरी कुटुंबांच्या भवितव्याशी जोडलेला असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. ‘आश्वासने नकोत, ठोस जलनियोजन हवे’ कुकडी प्रकल्पासाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक करतानाच, जामखेड तालुक्याच्या पाण्यासाठीही त्याच ताकदीने आणि सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे अवधूत पवार यांनी सांगितले.
जामखेडचा कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या जलनियोजनात समावेश करावा, कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेत तालुक्याला स्थान द्यावे, तसेच जामखेडसाठी स्वतंत्र दीर्घकालीन जलनियोजन व सिंचन आराखडा तयार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“इतर दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळावे, याला जामखेडकरांचा विरोध नाही. मात्र जामखेडच्या शेतकऱ्यांच्याही हक्काच्या पाण्याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. आता आश्वासनांपेक्षा ठोस निर्णय, स्पष्ट सिंचन आराखडा आणि प्रत्यक्ष पाण्याची हमी हवी,” अशी भूमिका अवधूत पवार यांनी मांडली.
कुकडी प्रकल्पाला मिळालेली मंजुरी स्वागतार्ह असली, तरी जामखेडच्या शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार नसेल तर हा आनंद अपूर्णच राहणार, अशी भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे शासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी जामखेडच्या पाणीप्रश्नाकडे गांभीर्याने कधी पाहणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. — अवधूत पवार, सामाजिक कार्यकर्ते