Friday, August 21, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड तालुक्यातील शाळांमध्ये ‘सुरक्षित अन्न’चा जागर; जंक फूड टाळण्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे...

जामखेड तालुक्यातील शाळांमध्ये ‘सुरक्षित अन्न’चा जागर; जंक फूड टाळण्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे आवाहन

0
7
जामखेड तालुक्यातील शाळांमध्ये ‘सुरक्षित अन्न’चा जागर; जंक फूड टाळण्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे आवाहन

जामखेड न्युज – – – – – 

जामखेड तालुक्यातील शाळांमध्ये ‘सुरक्षित अन्न’चा जागर; जंक फूड टाळण्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे आवाहन

विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व सकस अन्न मिळावे, तसेच शाळा परिसरात अन्न सुरक्षा मानकांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना अन्न सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेत सुरक्षित अन्न व संतुलित आहाराचे धोरण प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अहिल्यानगरचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी अन्न सुरक्षा मानके, शाळेतील भोजन व्यवस्था, स्वच्छता, अन्न तयार करण्याची पद्धत तसेच अन्न विक्रीसंदर्भातील नियमांची सविस्तर माहिती दिली. सहाय्यक अन्न सुरक्षा अधिकारी सोपान इंगळे यांनी शाळा परिसर तसेच शाळेबाहेरील परिसरातील अन्न विक्रीबाबत मार्गदर्शन केले.

२८ जुलै २०२६ रोजीच्या शालेय पोषण आहारासंदर्भातील परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. ल. ना होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ए. पी. जे अब्दुल कलाम सभागृहात मिटींगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात येणारा आहार पौष्टिक व संतुलित असावा. पोळी, भात, कडधान्ये, पालेभाज्या, फळे व इतर भाज्यांचा आहारात समावेश असावा. आहारामध्ये प्रथिने, कर्बोदके व खनिजे यांचा योग्य समतोल असणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या डब्यांमध्येही पोषक आहार असावा. वेफर्स, बिस्किटे व इतर जंक फूडऐवजी पोळी, भाजी, पालेभाज्या व घरगुती सकस पदार्थ देण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये अन्न सुरक्षा व पोषणाबाबत जनजागृती करण्यासाठी शाळांनी विशेष उपक्रम राबवावेत, तसेच विद्यार्थी व पालकांसाठी चार कार्यशाळा घेण्याची सूचना करण्यात आली.

शाळा परिसरात स्वच्छतेला प्राधान्य
शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी वर्षातून दोन वेळा करणे आवश्यक आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे पाणी स्वच्छ व तपासणी केलेले असावे. अन्न तयार करताना स्वच्छतेचे काटेकोर पालन करावे, अन्न व्यवस्थित शिजवावे आणि त्यामध्ये कोणतेही खडे अथवा बाह्य पदार्थ राहणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे प्रदीप पवार यांनी स्पष्ट केले.

 

अन्न तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक स्वच्छता राखावी. स्वयंपाक करताना डोक्यावर टोपी किंवा योग्य संरक्षण असावे. महिला कर्मचाऱ्यांनी स्वयंपाक करताना हातातील बांगड्या काढणे आवश्यक असल्याचेही मार्गदर्शन करण्यात आले.

अन्न व्यवसायासाठी लायसन्स व रजिस्ट्रेशन आवश्यक
अन्न विक्री अथवा अन्न तयार करणाऱ्या संबंधित घटकांनी आवश्यक अन्न सुरक्षा लायसन्स व रजिस्ट्रेशन करून घेणे गरजेचे आहे. याबाबत सोपान इंगळे यांनी पीपीटीच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. संबंधित व्यावसायिकांनी नियमांनुसार नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.

शाळांमध्ये अन्न सुरक्षेसाठी नोडल शिक्षकाची नियुक्ती करावी, तसेच लायसन्सधारक नोडल अधिकारी व संबंधित यंत्रणेमार्फत अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, याची नियमित पाहणी करावी, असेही सांगण्यात आले.

जंक फूडच्या विक्रीवर निर्बंध
शाळांच्या परिसरात उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री होऊ नये, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. शाळेच्या ५० मीटर परिसरात जंक फूड, मिठाई, बिस्किटे, गोळ्या तसेच अधिक मीठ-साखर असलेल्या पदार्थांची विक्री व जाहिरात रोखण्यासाठी नियमांची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर नियमानुसार कारवाई करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

शाळेच्या परिसरात सुरक्षित अन्न, स्वच्छता आणि पोषण याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आवश्यक ते सूचना फलक लावावेत, असेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख राम निकम यांनी केले. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनी अन्न सुरक्षा दक्षता बाळगणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना सकस डबा मिळावा आणि शालेय परिसरात सुरक्षित अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी शाळा प्रशासनाने पालक व विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने जनजागृती करावी, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे, अहिल्यानगरचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, सहाय्यक अन्न सुरक्षा अधिकारी सोपान इंगळे, केंद्रप्रमुख राम निकम, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दशरथ कोपनर, केंद्रप्रमुख विक्रम बडे, केशव गायकवाड, पांडुरंग मोहळकर, माजीद शेख, महिला व बालविकास अधिकारी सानप मॅडम यांच्यासह तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

शिक्षक नेते नारायण राऊत यांनी सर्व शिक्षकांच्या अडचणी मांडल्या तर
गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे यांनी सर्व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ल. ना. होशिंग विद्यालयाचे उपमुख्याध्यापक अनिल देडे यांनी केले, तर मुख्याध्यापक अप्पा शिरसाठ यांनी आभार मानले. सुरक्षित अन्न, स्वच्छता आणि संतुलित आहार ही विद्यार्थ्यांच्या निरोगी भविष्यासाठी त्रिसूत्री असून, त्याची शाळा पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!