जामखेड न्युज – – – – –
ल. ना. होशिंग विद्यालयात स्वातंत्र्यदिनाचा ७९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
माजी विद्यार्थी प्रशांत मनोहर कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण; एनसीसी संचलन, देशभक्तीपर गीतांसह विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड येथे भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा ७९ वा वर्धापन दिन शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे विद्यालयाचे माजी विद्यार्थी व पुणे येथील युवा उद्योजक, उच्च विभूषित मा. प्रशांत मनोहर कुलकर्णी यांच्या हस्ते सकाळी ८.०५ वाजता झालेला ध्वजारोहण समारंभ. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी, भाऊ व मुलगी उपस्थित होते.

आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्याच विद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्याचा मान मिळाल्याबद्दल प्रशांत कुलकर्णी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यालयाशी असलेले ऋण व्यक्त करताना प्रशांत कुलकर्णी म्हणाले, “याच शाळेत मी शिकलो आणि आज याच शाळेचे ध्वजारोहण करण्याचे भाग्य मला मिळाले, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेसाठी काहीतरी देणे लागतो. विद्यालयासाठी दोन हजार लिटर पेंट देणे हे माझे कर्तव्य समजून मी कलर दिला आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहणानंतर विद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध कलागुणांचे सादरीकरण केले.
यावेळी प्राचार्य बी. ए. पारखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की संस्था अमृत महोत्सव साजरा करत आहे. विद्यालयाने अ प्लस श्रेणी प्राप्त केले आहे. पुढे बोलताना सांगितले की, केवळ घोषणाबाजी न करता स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या विचारांची व त्यागाची आठवण ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व समजून घेऊन देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार नागरिक म्हणून योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.




