Thursday, August 13, 2026
Home ताज्या बातम्या देवदैठण बनकर वस्तीच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण आजारी व मयत व्यक्तींनाही...

देवदैठण बनकर वस्तीच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण आजारी व मयत व्यक्तींनाही झोळीतून न्यावे लागते, रस्ता तातडीने करण्याची मागणी

0
6
देवदैठण बनकर वस्तीच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण   आजारी व मयत व्यक्तींनाही झोळीतून न्यावे लागते, रस्ता तातडीने करण्याची मागणी

जामखेड न्युज – – – – – 

देवदैठण बनकर वस्तीच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण

आजारी व मयत व्यक्तींनाही झोळीतून न्यावे लागते, रस्ता तातडीने करण्याची मागणी

जामखेड तालुक्यातील मौजे देवदैठण येथील माळी (बनकर) वस्ती, भोरे वस्ती तसेच गायकवाड वस्तीला जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्याअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रशासनाने तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी सुमारे साठ ते सत्तर ग्रामस्थ, महिला आज उपोषणास बसले आहेत.

बनकर वस्तीवर सुमारे ५० घरे असून जवळपास २०० नागरिकांची लोकसंख्या आहे. मात्र या वस्तीला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने दैनंदिन जीवनच त्रस्त झाले आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनते. चिखल, खड्डे आणि खराब रस्त्यामुळे दुचाकी, चारचाकी जात नाही तसेच पायी चालणेही कठीण होते.

आजारी व्यक्तींना झोळीतून नेण्याची वेळ रस्त्याअभावी एखादी व्यक्ती अचानक आजारी पडल्यास तिला वेळेत दवाखान्यात नेणे मोठे आव्हान ठरते. रुग्णवाहिकेलाही या भागात पोहोचणे कठीण असल्याने आजारी व्यक्तींना झोळी करून मुख्य रस्त्यापर्यंत आणण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असल्याचे सांगण्यात आले.

मयत व्यक्तीला अंत्यविधीसाठी घेऊन जातानाही नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
शाळकरी मुलांच्या ये-जा करण्यावरही या रस्त्याचा मोठा परिणाम होत आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना चिखलातून मार्ग काढत शाळेत जावे लागते. शेतीची कामे, शेतमालाची वाहतूक आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंची ने-आण करताना शेतकरी व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.

पांदण शेतरस्ता मंजूर; न्यायालयीन वादामुळे प्रश्न प्रलंबित ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रस्ता पांदण शेतरस्ता म्हणून मंजूर आहे. मात्र या रस्त्याबाबत न्यायालयीन वाद सुरू असल्याने प्रत्यक्षात रस्ता वापरताना अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून कायदेशीर बाबींचा निपटारा करावा आणि नागरिकांना ये-जा करण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

रस्त्याच्या प्रश्नाबाबत प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी माहिती देऊनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत अडचणींची दखल घेऊन संबंधित रस्ता प्रकरणाचा तातडीने निपटारा करावा, रस्ता खुला करून द्यावा आणि पावसाळ्यातील नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या मागणीसाठी सरपंच अनिल भोरे, कॅप्टन लक्ष्मण भोरे, आश्रु बनकर, भीमराव बनकर, खंडू बनकर, मोहन बनकर, वामन बनकर, रघुनाथ बनकर, लिलाबाई बनकर, सुवर्णा बनकर, कांताबाई बनकर, हिराबाई भोरे, निर्मला भोरे, लक्ष्मी भोरे यांच्यासह ग्रामस्थांनी भूमिका मांडली आहे.

“रस्ता हा आमच्या वस्तीतील नागरिकांसाठी केवळ ये-जा करण्याचा मार्ग नसून जीवनावश्यक सुविधा मिळविण्याचा आधार आहे. प्रशासनाने आमच्या अडचणींची तातडीने दखल घेऊन रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा,” अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!