Home ताज्या बातम्या जामखेड आरोग्यसेवेचे हब – आमदार सुरेश धस जामखेडमध्ये ‘साई समर्थ हाडांचा...

जामखेड आरोग्यसेवेचे हब – आमदार सुरेश धस जामखेडमध्ये ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा शुभारंभ उत्साहात संपन्न

0
6

जामखेड न्युज – – – – – 

जामखेड आरोग्यसेवेचे हब – आमदार सुरेश धस

जामखेडमध्ये ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा शुभारंभ उत्साहात संपन्न

जामखेड शहरात दिवसेंदिवस अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होत असून शहराची वाटचाल आरोग्यसेवेच्या महत्त्वाच्या केंद्राकडे होत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील साई समर्थ हाडाचा दवाखाना व एमआरआय सेंटरचे उद्घाटन आमदार सुरेश धस यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

समाजात डॉक्टरांवर रुग्णांचा दृढ विश्वास आहे. कारण डॉक्टर कधीही जात-पात न पाहता प्रत्येक रुग्णाची निःस्वार्थपणे सेवा करतात. जामखेड शहरातील विविध रुग्णालयांनी आपल्या दर्जेदार सेवेमुळे नागरिकांचा विश्वास संपादन केला असून, नव्याने सुरू झालेल्या ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर`च्या माध्यमातूनही गरीब व गरजू रुग्णांना चांगली, परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल, गरीब व गरजू रुग्णांनी देखील शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुरेश (आण्णा) धस यांनी व्यक्त केला.

जामखेड शहरातील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा शुभारंभ रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी आमदार सुरेश (आण्णा) धस यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


या उद्घाटन समारंभास लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी, सामाजिक कार्यकर्ते संजय (काका) कोठारी, ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात, सभापती शरद कार्ले, किरण शिंदे, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, पै. बबन (काका) काशिद, नगरसेवक प्रविण सानप, नगरसेवक श्रीराम डोके, नगरसेवक अशोक शेळके, माजी पाणीपुरवठा सभापती अमित चिंतामणी, सुनील कोठारी, राहुल उगले, नगरसेवक गणेश डोंगरे,माजी नगराध्यक्ष विकास (तात्या) राळेभात, विनायक राऊत, संजय नवले, विनोद नवले, लहू शिंदे, प्रविण होळकर, हाडांचे तज्ज्ञ डॉ. अजय शिरसागर, एम.डी. मेडिसिन तज्ज्ञ डॉ. वैभव हुंबे, हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत दारकुंडे व डॉ. सोनाली दारकुंडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गरीब रुग्णांच्या उपचारासाठी विविध शासकीय आरोग्य योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. साई समर्थ हॉस्पिटलनेही या योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवावा. अनेक महागड्या शस्त्रक्रियाही शासनाच्या योजनांमधून मोफत होऊ शकतात. त्यामुळे रुग्णांना या योजनांची माहिती देणे आणि त्यांचा लाभ मिळवून देणे हीदेखील रुग्णालयाची सामाजिक जबाबदारी आहे. जामखेड नगरपरिषदेत स्वतंत्र वैद्यकीय कक्ष सुरू करण्याची गरज असून त्याचा फायदा अनेक गरजू नागरिकांना होईल. मदत करण्यासाठी माणुसकी आवश्यक असते आणि ती डॉ. भरत दारकुंडे यांच्यामध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळणे ही काळाची गरज आहे. साई समर्थ हॉस्पिटल सुरू झाल्यामुळे आता अनेक रुग्णांना किरकोळ तसेच हाडांच्या उपचारांसाठी नगर किंवा पुणे येथे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. डॉ. भरत दारकुंडे यांनी रुग्णसेवेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू नागरिकांना आधार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हाती घेतले आहे, असेही त्या म्हणाल्या.

ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील बहुतांश रुग्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात. त्यामुळे त्यांना कमी खर्चात आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेमुळे हे हॉस्पिटल जामखेड व परिसरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रुग्णांना अत्याधुनिक, दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर सुरू करण्यात आले असून, या रुग्णालयामुळे जामखेडसह परिसरातील हजारो रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अजय शिरसागर यांनी केले, तर सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साई समर्थ हॉस्पिटलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!