जामखेड न्युज – – – – –
अनेक वर्षांपासून प्रलंबित लोणी–शिव ते वाकी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने
जामखेड तालुक्यातील लोणी येथील शिव ते वाकी या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नावर अखेर सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायतीमार्फत दि. १ जुलै २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी गावात दाखल झाले.

या पाठपुराव्यासाठी माजी पोलीस उपअधीक्षक संजय लोहकरे , दिलीप धावडे, काकासाहेब शेळके, तुळशीराम आण्णा, सरपंच तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी सातत्याने संपर्क ठेवला. त्यानुसार विभागाचे आवटी साहेब यांनी आज लोणी येथे येऊन रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी गावातील हनुमान मंदिरासमोर ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या प्रारंभी गावाच्या वतीने सरपंचांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सरपंचांचाही उपस्थित ग्रामस्थांनी सन्मान केला.

बैठकीत ग्रामस्थांनी रस्त्यावरील अतिक्रमण, वाहतुकीच्या अडचणी, अपघातांची शक्यता आणि रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आपली मते मांडली. सविस्तर चर्चेनंतर अधिकारी, सरपंच व ग्रामस्थांनी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्याचा भाग नांगरल्याचे, तर काही ठिकाणी धोकादायक वळणे व रस्त्यालगत असलेल्या झाडांमुळे अपघात होण्याचा धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी नोंदविले. सर्व ठिकाणांचे छायाचित्रण करून अहवाल तयार करण्यात आला.



