जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड पोलीस स्टेशन येथे निवारा बालगृह मोहा फाटा येथील मुलींनी , पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना राखी बांधून या वर्षीचा रक्षाबंधन साजरा केला.
यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात, या देशातील सर्व बहिणी सुखी राहाव्या म्हणून खाकी रूपातील पोलीस रात्रंदिवस आपल्या परीने सेवा बजावत असतात,हे करताना असंख्य पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीच्या हाताने राखी बांधता येत नाही, आज बहिणीची कमी निवारा बालगृहातील या अनाथ मुलांनी भरून काढली असे मनोगत त्यांनी व्यक्त केलं.
संस्थेचे संस्थापक अँड.डॉ. अरुण जाधव यांनी आपल्या मनोगतात ज्या कुणी अनाथ निराधार माताभगिनी आहेत, त्यांचा भाऊ म्हणून ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने निश्चित काम करत राहू अशी त्यांनी ग्वाही दिली.
ADVERTISEMENT

संस्थेचे संचालक बापू ओहोळ यांनी आपल्या मनोगतात आधुनिक जगातील स्त्रीने रक्षाबंधन नव्हे तर रक्षास्वातंत्र्य या गोष्टीचा पुरस्कार करायला हवा, स्त्री सुद्धा सक्षम आहे , या गोष्टीचा अंगीकार आधुनिक स्त्री ने करून एक नवा पायंडा पाडावा असे मत त्यांनी व्यक्त केल.
ग्रामीण विकास केंद्र जामखेड संचलित निवारा बालगृह मोहा फाटा (समता भूमी) तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या ठिकाणी अनाथ, निराधार, वंचित, लोककलावंत, वीटभट्टी कामगार, ऊसतोड मजूर, भटके-विमुक्त, आदिवासी घटकातील 71 मुलां- मुलींच्या शिक्षणासाठी हे बालगृह चालवले जात असून ,या बालगृहाला शासनाची कोणतीही मदत मिळत नाही. हा प्रकल्प जामखेडच्या वैभवात भर टाकणारा शैक्षणिक प्रकल्प आहे. माणसाचा उत्साह वाढवणारा प्रकल्प आहे.
कोरोना असो वा, इतर कुठल्याही आपत्तीच्या काळात पोलीस बांधव आपल्या जीवाची बाजी लावून सामान्य जनतेच्या सेवा कार्यात सहभागी असतात, या त्यांच्या कामचे आणि त्यागाचे ऋणी म्हणून बालगृहातील मुलीनी जामखेड पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस बांधवांसोबत यंदाचा रक्षाबंधन सण साजरा केला.
यावेळी ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक अँड.डॉ. अरुण जाधव, संचालक बापू ओहोळ, जालिंदर यादव सर, प्रकल्प समन्वयक संतोष चव्हाण, निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजीनाथ केसकर, सचिन भिंगारदिवे, सागर भांगरे, राकेश साळवे, राजू शिंदे,विकास साळुंके, वैशाली मुरुमकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.






