ज्ञानराधा च्या आणखी एका ठेवीदाराचा मानसिक धक्याने मृत्यू
सेवानिवृत्तीची सर्वच पुंजी ज्ञानराधा, मानसिक धक्क्यातून अरूण सुतार सरांचे निधन
ज्ञानराधा पतसंस्था गेल्या अडीच वर्षापासून बंद आहे. शेकडो लोकांचे कोट्यवधी रुपये पतसंस्थेत अडकलेले आहेत. यामुळे अनेक लोकांना मानसिक धक्के बसत आहेत. यातच अनेकांचे बळी जात आहेत. लवकरात लवकर शासनाने पतसंस्थेची मालमत्ता ताब्यात घेऊन ठेवीदारांच्या ठेवी परत कशा मिळतील हे पाहणे गरजेचे आहे.
अरूण आजीनाथ सोळसकर (सुतार सर) हे सेवानिवृत्त शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर आपली सेवानिवृत्तीची सर्व पुंजी म्हणजे 52 लाख रुपये ज्ञानराधा पतसंस्थेत ठेवले चांगला व्याजदर यामुळे सुरुवातीला चांगली सेवा मिळत होती. अडीच वर्षांपूर्वी पतसंस्था बंद पडली आणि होत्याचे नव्हते झाले जीवन जगण्यासाठी वृध्दापकालात संघर्ष सुरू झाला ठेवी परत मिळाव्यात म्हणून लढा सुरू झाला या लढ्याचे नेतृत्व डॉ प्रदीप कात्रजकर बरोबर सुतार सर करत होते वेगवेगळे निवेदन व न्यायालयीन लढा देण्यात ते आघाडीवर होते. अडीच वर्षे झाले तरीही ठेवी परत मिळत नाहीत या धक्क्यामुळे शेवटी आज त्यांचे दुख:त निधन झाले. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. सायंकाळी साडेनऊ वाजता जामखेड तपनेश्वर येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जामखेडच्या ज्ञानराधा शाखेत परिसरातील अनेक लोकांच्या ठेवी अडकल्याने ठेवीदार मानसिक तणावाखाली आहेत. अनेक लोकांनी पोटाला चिमटा देत उतारवयात व्याजाच्या पैशावर औषधपाणी व पोटाची गुजराण करण्यासाठी तसेच अनेकांनी मुला मुलींच्या लग्नासाठी ठेवी ठेवल्या होत्या आता पतसंस्था बंद पडल्याने सर्वच ठेवीदार मानसिक तणावाखाली आहेत.
एक वर्षांपूर्वी तालुक्यातील साकत येथील मोतीराम वराट यांनी आपली जमीन विकून आलेली सर्व पुंजी म्हणजे 14 लाख रुपये पतसंस्थेत ठेव ठेवली होती. व्याजावर उतारवयात उदरनिर्वाह होईल म्हणून खात्रीने पैसे ठेवले होते. पण दीड वर्षापूर्वी पतसंस्था बंद पडल्याने मोतीराम वराट हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. यातच त्याचे निधन झाले.
तसेच श्यामराव मुरूमकर हे मोलमजुरी करणारे गृहस्थ होते. तसेच शेळ्या सांभाळून कुटुंबांचा उदरनिर्वाह करत होते. मोलमजुरी तसेच शेळ्या विकून आलेली पुंजी ज्ञानराधा पतसंस्थेत ठेव म्हणून ठेवली होती सुमारे चार लाख रुपये होते पण पतसंस्था बंद पडल्याने मानसिक तणावाखाली असलेले मुरूमकर यांचे दीड महिन्यांपुर्वी निधन झाले होते.
‘ज्ञानराधा मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’च्या ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ११ ठेवीदारांनी दाखल केलेल्या याचिकेतून या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे देऊन ठेवीदारांना तीन महिन्यांच्या आत रक्कम देण्याच्या संदर्भाने आदेश द्यावेत, अशी विनंती केली आहे.
ज्ञानराधाने १३ ते १८ टक्के व्याज दराचे आमिष दाखवून देशभरातील सुमारे सहा लाख लोकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित केले, परंतु आता सुमारे ३ हजार ५०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. अनेक ठेवीदारांचे पैसे अडकून पडले आहेत. आणि त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणानी संविधानाच्या कलम २१ अंतर्गत ‘सन्मानाने जगण्याच्या’ अधिकाराचे उल्लंघन होत आहे. लवकरात लवकर ठेवी परत मिळाव्यात अशी मागणी होत आहे.