बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कुरेशी मोहल्ला येथे कत्तलीसाठी 8 गोवंश विनापाणी व चाऱ्याशिवाय डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली. मानद पशु कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे मधुकर भोसले यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ जामखेड पोलिस निरीक्षकांशी संपर्क साधला.
पोलिसांनी तत्पर कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकून सर्व 8 गोवंश ताब्यात घेतले. याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सोडवण्यात आलेले सर्व गोवंश मुळेवाडी येथील रुक्मिणी गोशाळेत सुखरूप सोडण्यात आले आहेत.
यावेळी बोलताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले म्हणाले, “जामखेड शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांबाबत आम्ही जामखेड नगरपरिषदेला वेळोवेळी निवेदन दिले आहेत. मात्र नगरपरिषदेने अद्यापही हे कत्तलखाने बंद केलेले नाहीत. भर चौकात उघडपणे बीफ खानावळ सुरू असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही.”
लोकप्रतिनिधींनाही दिले निवेदन शहरातील कत्तलखाने व मोठ्या प्रमाणावर होणारी गोतस्करी थांबवावी यासाठी आमदार रोहित पवार व सभापती राम शिंदे यांनाही निवेदने देण्यात आली आहेत. तरीही अपेक्षित कारवाई होत नसल्याची खंत पांडुराजे भोसले यांनी व्यक्त केली.
आंदोलनाचा इशारा “जर प्रशासनाने बेकायदेशीर कत्तलखान्यांवर तातडीने कारवाई करून ते बंद केले नाहीत, तर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा यावेळी पांडुराजे भोसले यांनी दिला. जामखेड पोलिसांची कारवाई अपुरी पडत असल्याचा आरोपही त्यांनी केला.