Sunday, May 24, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड शहरात दोन रस्ते अपघात, जखमींना संजय कोठारींकडून मदत

जामखेड शहरात दोन रस्ते अपघात, जखमींना संजय कोठारींकडून मदत

0
2

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेड शहरात दोन रस्ते अपघात, जखमींना संजय कोठारींकडून तातडीची मदत

शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गंभीर अपघातातील जखमींना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तातडीने मदत करत रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या तत्परतेमुळे दोन व्यक्तींचे प्राण वाचण्यास मदत झाली आपत्कालीन परिस्थितीत आणि अपघाताच्या वेळी धावून जात जखमींचे प्राण वाचवणे, हीच खरी ईश्वरसेवा मानणारे जामखेडमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेची प्रचिती दिली आहे.

शहरातील तपनेश्वर रोडवरील चिंचेच्या झाडाखाली एक अनोळखी, बेवारस व्यक्ती रस्त्याच्या कडेला अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत पडली होती. अज्ञात कारणाने झालेल्या या अपघातात त्या व्यक्तीच्या डोक्याला जबर मार लागला होता आणि ती रक्ताच्या थारोळ्यात होती. या घटनेची माहिती कुशल शेगर यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली.

माहिती मिळताच कोठारी यांनी कोणतीही वेळ न घालवता थेट घटनास्थळ गाठले. त्यांनी या बेवारस जखमी व्यक्तीला स्वतःच्या वाहनातून तातडीने शासकीय रुग्णालयात आणून दाखल केले. संजय कोठारी यांच्या तत्परतेमुळे या अज्ञात व्यक्तीवर वेळेत उपचार सुरू झाले असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

दुसरी दुर्घटना बीड रोडवरील पेट्रोल पंपासमोर घडली. किरण बबन बांगर (वय ४०, रा. मु. पो. नवगण राजुरी, ता. जि. बीड) हे आपल्या मोटरसायकल वरून जात असताना, रस्त्याच्या कडेला असलेल्या खडीवरून (खटकी) त्यांची दुचाकी जोरात घसरली. हा अपघात इतका भीषण होता की, खाली पडल्यामुळे किरण यांच्या छातीत रस्त्यावरील काचा घुसल्या आणि ते गंभीर जखमी झाले.

तेथील उपस्थित नागरिकांनी या अपघाताची माहिती देताच, संजय कोठारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमी किरण बांगर यांना तात्काळ रुग्णालयात हलवले आणि डॉक्टरांना पुढील उपचाराची विनंती केली.

अपघाताची माहिती मिळताच जखमींना वेळेत उपचार मिळावेत यासाठी माजी सभापती भगवानराव मुरूमकर पोलीस कॉन्स्टेबल आकाश शेवाळे, केतन जोशी, रवींद्र राळेभात, रवी बोधले, शंकर जाधव, जितेंद्र जाधव यांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले. तसेच अपघातातील जखमींना वेळेत मदत पोहोचवण्यासाठी दीपक भोरे आणि ऋषिकेश शेळके यांनीही मोलाची भूमिका बजावली.

“परिसरात कुठेही अपघात असो, संजय कोठारी हे नेहमीच जखमींच्या मदतीसाठी ढाल बनून उभे राहतात,” अशा भावना जामखेडच्या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. अपघाताच्या क्षणात त्यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि मानवतावादी कार्याबद्दल संपूर्ण तालुक्यातून संजय कोठारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे जाहीर कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!