जामखेड तालुक्यातील तेलगंशी गावातील तिघी बहिणीवर अभिनंदनाचा वर्षांव
तालुक्यातील दुर्गम आणि सोयी – सुविधांचा अभाव असलेल्या तेलंगशी गावच्या क्षीरसागर कुटुंबातील तीन सख्या बहिणींनी कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊन गावासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
रेखा,शितल आणि संगीता अशी या त्रिमूर्ती भगिनींची नावे असून,त्यांच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही,वडील देविदास (देवा दादा) क्षीरसागर आणि आई तारा आक्का यांनी अहोरात्र कष्ट केले. शेतमजुरी, उन्हाळ्यात सायकलवरून कुल्फी-आईस्क्रीम विकणे,दिवाळीत झाडू बांधणे आणि चिंचा गोळा करणे अशी मिळेल ती कामे करून त्यांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.
आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून तिन्ही बहिणींनी अभ्यासात आणि मैदानी तयारीत सातत्य राखले.सुट्टीच्या दिवशी आई-वडिलांना शेतात मदत करत त्यांनी आपले ध्येय गाठले.
आज मोठी मुलगी रेखा ही अहिल्यानगर पोलीस दलात,दुसरी मुलगी शितल ही पिंपरी-चिंचवड पोलीस दलात, तर तिसरी मुलगी संगीता ही मीरा-भाईंदर पोलीस दलात देशसेवा बजावत आहेत.मुली शिकली की लग्न करून देण्याची प्रथा मोडून काढत क्षीरसागर सरांनी मुलींना शिक्षणाचे बळ दिले आणि त्यांच्या कष्टाचे आज सार्थक झाले आहे.
त्यांचा लहान भाऊदेखील सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. गरीबी आणि सामाजिक अडचणींवर मात करत मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील इतर मुलींसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. शेतमजूर आई-वडिलांच्या कष्टाचे सार्थक!अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, सोयीसुविधांचा अभाव असतानाही वडील देविदास क्षीरसागर व आई तारा आक्का यांनी शेतमजुरी आणि उन्हाळ्यात सायकलवर कुल्फी विकून मुलांना शिकवले.
आई-वडिलांच्या या रक्ताच्या पाण्याचे तिन्ही लेकींनी चीज केले आहे. सुट्ट्यांमध्ये स्वतः शेळ्या राखत आणि चिंचा वेचत या बहिणींनी अभ्यास केला आणि आज खाकी वर्दी परिधान करून गावचा इतिहास बदलला!
“संघर्ष में जो तपता है,वही सोना बन जाता है, मेहनत करने वाला ही, मंजिल को पाता है।”या तिन्ही रणरागिणींच्या जिद्दीला आणि त्यांना घडवणाऱ्या माता-पित्यांच्या कष्टाला मानाचा मुजरा!