बाप लेकाच्या मारहाणीत बापाचा मृत्यू, जामखेड तालुक्यात एकच खळबळ
आपला बाप शेजार्यांना विणाकारण शिविगाळ करत आसल्याने मुलाने बापाला शेजार्यांना शिविगाळ करु नका असे सांगितले. त्यामुळे बापाने मुलाला कोयत्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मुलाने बापाच्या हातातील कोयता हिसकावून त्याच कोयत्याने व काठीने बापाला मारहाण केली. या मारहाणीत बापाचा मुत्यु झाला आहे. पोटच्या मुलानेच बापाची हत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की रविवार दि २६ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मयत वडील रावसाहेब उर्फ (बबन) विठ्ठल सोनवणे वय ६८ वर्षे रा. आरणगाव हे शेजार्यांना शिविगाळ करित होते. यावेळी आरोपी मुलगा आशोक रावसाहेब सोनवणे वय २४ वर्षे याने आपल्या वडीलांना शेजार्यांना शिविगाळ करु नका असे सांगितले.
मात्र वडीलांनी आपल्या मुलालाच कोयत्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मुलाने वडीलांच्या हातातील कोयता हिसकावून घेऊन वडीलांना कोयता व त्या ठिकाणी आसलेल्या काठीने पाठीवर व पोटावर मारहाण केली. या मारहाणीत रावसाहेब सोनवणे हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले.
त्यांना तातडीने जामखेड येथिल खाजगी रुग्णालयात घेऊन गेले व नंतर ग्रामिण रुग्णालय नेले यावेळी तेथील डॉक्टरांनी रावसाहेब सोनवणे मयत झाले असल्याचे सांगितले. घटना घडली त्या दिवशी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
यानंतर मयत रावसाहेब सोनवणे यांचा मुत्यु नेमका कशामुळे झाला यासाठी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सोमवार दि २७ रोजी पुणे येथील ससुन हॉस्पिटल याठिकाणी करण्यात आले. यावेळी रावसाहेब सोनवणे यांचा मुत्यु पोटात व पाठीवर झालेल्या जखमेमुळे पोटात रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला.
त्यानंतर मंगळवार दि २८ रोजी पो. कॉ. प्रविण इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा अशोक रावसाहेब सोनवणे याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे करत आहेत.