जामखेडमध्ये धूमस्टाईल चोरीचा प्रयत्न फसला! महिलेच्या धाडसाने चोर जेरबंद”
जामखेड तालुक्यातील आघी येथे रात्रीच्या अंधारात घडलेल्या चोरीच्या प्रयत्नाने खळबळ उडाली. एका महिलेच्या सतर्कतेमुळे आणि शौर्यामुळे आरोपी रंगेहाथ पकडला गेला आरोपी ज्ञानेश्वर भगवान काळे, रा. आघी तालुका जामखेड, जिल्हा आहिल्यानगगर याचा चोरीचा प्रयत्न फसला महिलेच्या धाडसाने आरोपी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.
याबाबत पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की दि १९ एप्रिल रोजी रात्री फिर्यादींच्या पत्नी (रा. आघी, ता. जामखेड) या आपल्या घराच्या पडवीमध्ये झोपल्या होत्या तर त्यांचे पती हे घरामध्ये झोपले होते.
याच दरम्यान दि २० एप्रिल २०२६ रोजी पहाटे ३:३० वाजता त्यांच्याच गावातील असलेला आरोपी ज्ञानेश्वर भगवान काळे हा घरात शिरला आणि फीर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न केला.
यावेळी फीर्यादीच्या पत्नी यांना हाताचा स्पर्श झाल्याने त्यांना जाग आली आणि प्रसंगावधान दाखवत आरोपीच्या डोक्याचे केस पकडून आरोपीस धरून ठेवलं आणि आरडाओरडा करुन मदत मागवली. यानंतर घरातील नातेवाईक व ग्रामस्थांनी आरोपीस पकडुन ठेवले व आरोपी फरार होण्यापूर्वीच पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणी महिलेचे पती पोपट मारुती तेरकर धंदा शेती, राहणार आघी, ता. जामखेड यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन वरील आरोपी विरोधात जामखेड शहर पोलीस ठाण्यात (क्र.मं. २२५/२०२६) भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ६२ (चोरीचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जितेंद्र सरोदे करीत आहेत.