जामखेड न्युज—–
कल्याण- अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात, 11 जणांचा जागीच मृत्यू, 2 जण जखमी

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर कल्याण परिसरात आज (13 एप्रिल 2026) सकाळी 10.45 सुमारास भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. एका इको टॅक्सी आणि मिक्सर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला.मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेले सर्वजण मुरबाड येथील रहिवासी असून ते कल्याणहून मुरबाडकडे जात होते. दरम्यान, संबंधित पुलावर सध्या एकमार्गी वाहतूक सुरू असल्याने वाहनांची गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर हा भीषण अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. पूल पूर्णपणे सुरक्षित नसतानाही घाईघाईत सुरू करण्यात आल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या धडकेनंतर ईको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सिमेंट मिक्सर आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. या भीषण धडकेत अकरा जणांनी जागीच प्राण गमावले आहेत.

या अपघातात ११ जणांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी आहेत. ईको टॅक्सी आणि मिक्सर ट्रकमध्ये धडक झाल्याने हा अपघात झाला. मयत सर्व मुरबाड मधील रहिवाशी आहेत. कल्याणहून मुरबाडला जात होते. पुलावर एकमार्ग सुरू असल्याने अपघात झाला आहे. प्रशासनाने योग्य ती काळजी न घेतल्याने स्थानिकांचा आरोप आहे. घाई घाईत पूल सुरू केल्याने अपघात झाला आहे, असंही स्थानिकांनी म्हटलं आहे. तर ईको टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते अशीही माहिती आहे.

मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांची नावे मिळाली आहेत.
बबलू चंदने
जिजा केंबरी
गणपत चंदे
अनंत पवार
भुषण घोरपडे
स्थानिकांची मदतीसाठी धाव
अपघाताचा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना आणि जखमीला बाहेर काढले.

या अपघातातील दोन गंभीर जखमी व्यक्तींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.





