प्राथमिक आरोग्य केंद्राची ‘१०८’ रुग्णवाहिकेला दे धक्का.!!
जामखेड तालुक्यातील परिस्थिती
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध असलेली ‘१०८’ रुग्णवाहिका गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार नादुरुस्त होत असल्याने आरोग्य सेवा पुरती कोलमडली आहे. विशेषतः या रुग्णवाहिकेची बॅटरी खराब झाल्याने ऐन आणीबाणीच्या वेळी गाडी सुरू होत नाही, परिणामी रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण झाले असून रुग्णवाहिकेला धक्का देऊन चालु करावी लागत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शासनाने ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय किंवा शहराच्या ठिकाणी हलवण्यासाठी मोफत १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. मात्र, नान्नज येथील केंद्रावर असलेली गाडी केवळ बॅटरीच्या तांत्रिक अडचणीमुळे शोभेची वस्तू बनली आहे.
अनेकदा अपघात किंवा गंभीर आजारी रुग्णांना नेण्यासाठी फोन केल्यानंतर गाडी वेळेवर उपलब्ध होत नाही. गाडी सुरू करण्यासाठी वारंवार धक्का मारण्याची वेळ चालक व रुग्णांच्या नातेवाईकांवर येत असल्याचे समजते.
नान्नज हे परिसरातील मोठे गाव असून, आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांवरील रुग्ण याच प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत. १०८ रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्यामुळे गरिबांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
खाजगी रुग्णवाहिका चालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्याने सामान्य रुग्णांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला आणि अपघातग्रस्तांना या स्थितीचा सर्वाधिक फटका सोसावा लागत आहे.
गाडीच्या बॅटरीबाबत संबंधित विभागाला वारंवार कळवूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. १०८ रुग्णवाहिकेचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीने तातडीने याची दखल घेऊन नवीन बॅटरी बसवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
जर येत्या काही दिवसांत रुग्णवाहिकेची दुरुस्ती होऊन ती पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाही, तर आरोग्य केंद्रासमोर आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. “एखाद्या रुग्णाचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. आता आरोग्य विभाग आणि १०८ सेवा व्यवस्थापन यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.