जामखेड न्युज—–
“एकल महिलांनी सन्मान, स्वाभिमान आणि स्वयंरोजगार सक्षमीकरणासाठी पुढे यावे- हेरंब कुलकर्णी”

समाजातील विविध परिस्थितींमुळे विधवा,परित्यक्ता,घटस्फोटित महिलांना ‘एकल’ म्हणून जीवन जगावे लागते.मात्र ही त्यांची चूक नसून परिस्थितीजन्य अवस्था आहे.अशा महिलांना समाजात सन्मान,सुरक्षितता आणि समान संधी मिळणे हा त्यांचा घटनात्मक आणि मानवी अधिकार आहे.एकल महिलांनी सन्मान,स्वाभिमान आणि स्वयंरोजगार,सक्षमीकरणासाठी पुढे यावे असे प्रतिपादन साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केले.

आर.सी.एफ,जगदंब फाऊंडेशन,साऊ एकल समिती व स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिला आरोग्य तपासणी शिबीर व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्या प्रसंगी जामखेड पंचायत समिती येथे ते बोलत होते.

यावेळी गटविकास अधिकारी शुभम जाधव,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोराडे,बालविकास प्रकल्प अधिकारी हिरा सानप,निवारा बालगृहाचे सर्वेसर्वा अरुण जाधव,कर्जत तालुका समन्वयक उज्वला शेळके,उमेदचे अधिकारी श्यामाप्रसाद सुमंत,रमेश धोत्रे,स्वप्नील नेहरकर,आकाश खरात,पत्रकार यासिन शेख,प्रहार तालुका अध्यक्ष नय्युम सुभेदार,अनिल आष्टेकर,मीनाक्षी कुलकर्णी आदी विचार मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना कुलकर्णी म्हणाले की;शासनाच्या विविध योजना, निराधार, निवृत्तीवेतन, आरोग्य विमा,स्वयंरोजगार योजना,बचत गट उपक्रम,तसेच विविध शासकीय कागदपत्रे पूर्तता प्रक्रिया,योग्य माहिती व प्रशासनाचे सकारात्मक सहकार्य मिळणे आवश्यक आहे.शासन-प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्यातील समन्वयातूनच एकल महिलांचे खरे सक्षमीकरण शक्य आहे.

यासाठी महिलांनी आता पुढे येत स्वयंरोजगारसाठी सज्ज होत सक्षमीकरणाची नवी वाट धरावी अन आता रडायचे नाही लढायचे कानमंत्र देत विविध व्यावसायिक रोजगार कसा मिळवता येईल यांवर उपाययोजनांची माहिती देत स्वयंरोजगारातून आर्थिक स्थैर्याची वाट धरा अशी सादही त्यांनी एकल महिलांना घातली.

या आरोग्य तपासणी आणि स्वयंरोजगार मेळाव्यात एकल महिलांसाठी कौटुंबिक व सामाजिक हक्कांबाबत कायदेविषयक मार्गदर्शन,शासकीय योजनांची माहिती व अर्ज प्रक्रिया सहाय्य कागदपत्रांबाबत सल्ला व मार्गदर्शन तसेच तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत आरोग्य तपासणी, रक्तदाब, हिमोग्लोबिन, मधुमेह,किडनी,कॅन्सर तपासणी करत आवश्यक ते औषधोपचार देण्यात आले.तसेच स्वयंरोजगार व कौशल्य विकासाबाबत माहिती सकस संतुलित आहाराचे किट वाटप करण्यात आले.

यावेळी गटविकास अधिकारी शुभम जाधव,निवारा बालगृहाचे अरुण जाधव,कर्जत तालुका समन्वयक उज्वला शेळके आदींची भाषणे झाली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत योगेश अब्दुले म्हणाले की;हा मेळावा केवळ शिबिर नसून एकल महिलांच्या स्वाभिमानाचा आवाज आहे.समाजातील उपेक्षित एकल महिलांना मुख्य प्रवाहात आणणे,त्यांना आत्मविश्वास देणे आणि स्वावलंबी बनविणे आणि एकल महिलांच्या सन्मानपूर्वक जीवनासाठी आरोग्य,कायदेविषयक हक्क,शासकीय योजना व स्वावलंबनाच्या संधी या सर्व बाबी एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.




