संचालक सुधीर राळेभात यांचा बाजार समिती कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीला उडीद / सोयाबीन खरेदी केंद्र चालू करण्याची परवानगी मिळून १५ दिवस उलटून गेले तरी अद्यापपर्यंत उडीद / सोयाबीन खरेदी केंद्र सुरु केलेले नाही. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. जर चार दिवसांत हमीभाव केंद्र सुरू झाले नाही तर बाजार समिती कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा संचालक सुधीर राळेभात यांनी निवेदनाद्वारे दिला आहे यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सभापती सचिव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाजार समिती हि शेतकऱ्यांची संस्था असून देखील शेतकऱ्याला आपला माल घालण्यासाठी ताटकळत बसावे लागत आहे. हमी भाव केंद्र लवकर चालू झाले नाही तर शेतकऱ्याला आपले सोयाबीन १०००/१२०० रु.च्या तोट्यावर व्यापाऱ्यांना माल द्यावा लागत आहे.यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
त्यामुळे बाजार समितीने हमीभाव केंद्र लवकरात लवकर चालू करावेत तसेच उडीद / सोयाबीनची नोंदणी देखील अत्यंत हळुवार पद्धतीने चालू आहे.
जवळ-जवळ १००० ते १२०० शेतकऱ्यांची नोंदणीचे कागदपत्रे बाजार समितीने आपल्याकडे घेतली असून त्यातील फक्त ४०० ते ४५० शेतकऱ्यांची नोंद आतापर्यंत झालेली आहे.
त्यामुळे येत्या ४ दिवसात खरेदी केंद्र चालू केले नाही तर दिनांक १५/१२/२०२५ रोजी सभापती/सचिव यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकले जाईल, असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक श्री.सुधीर जगन्नाथ राळेभात यांनी दिला आहे.
चौकट हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची पुर्व तयारी झालेली आहे. फक्त शासनाकडून ग्रेडर आले की केंद्र सुरू करण्यात येईल दोन दिवसांत ग्रेडर येईल आणि केंद्र सुरू होईल.
शरद कार्ले – सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड