भटके विमुक्त समाजाच्या ओळख, हक्क व अधिकारांच्या लढ्यास नवी दिशा देण्यासाठी जामखेडमध्ये ३१ ऑगस्ट रोजी भटके विमुक्त राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ग्रामीण विकास केंद्र, जामखेड व डॉ.आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेच्या वतीने ही परिषद होत असून, प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते सुजात आंबेडकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापूसाहेब ओव्हळ यांनी दिली.
परिषदेस जेष्ठ सामाजिक नेते ललित बाबर, ॲड. डॉ. अरुण जाधव (समन्वयक, भ.वि.-आदिवासी संयोजन समिती), प्रा. किसन चव्हाण, मच्छिंद्र भोसले, भरत (महाराज) जाधव, अनिल जाधव, नंदू मोरे तसेच बापूसाहेब ओव्हळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता तहसिल कार्यालयासमोरून वाजत-गाजत रॅलीने होणार आहे. सकाळी ११.३० वाजता शाहीर शितल साठे परिवर्तनवादी गीतांचा जलसा सादर करतील.
त्यानंतर जामखेड-कर्जत परिसरातील ३० वस्त्यांवर केलेल्या सामाजिक सर्व्हेचा फॅक्ट फाईंडींग अहवाल प्रकाशन व मांडणी होणार आहे. दुपारी मान्यवरांची मनोगते, कलाकारांचे कार्यक्रम व भोजनाचा कार्यक्रम होईल.
या परिषदेत सुजात आंबेडकर समाजबांधवांशी थेट संवाद साधणार असून संघटनाबांधणी, महिलांचा सहभाग, शिक्षण-रोजगारातील संधी आणि समाजाच्या हक्कासाठी संघर्षाची गरज याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.