नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये – सभापती प्रा. राम शिंदे कर्जत व राशीन येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात

0
452

जामखेड न्युज—–

नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये – सभापती प्रा. राम शिंदे

कर्जत व राशीन येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात

कर्जत शहर व मौजे राशीन येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. नागरिकांनी शांतता ठेवावी, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व कुठल्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कर्जत शहर व मौजे राशीन येथील कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात आयोजित बैठकीत प्रा. शिंदे बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, कर्जतचे उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रा. राम शिंदे म्हणाले, कर्जत शहर व मौजे राशीन येथे झेंडा लावण्यावरून झालेल्या वादाबाबत दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनी गावपातळीवर ठराविक प्रमुखांसह एकत्र येऊन हा प्रश्न सोडवावा, अशी प्रत्यक्ष विनंती करण्यात आली आहे. तसेच याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनीही बैठक घेतली आहे.

समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि स्थानिक पातळीवर हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने दोन्ही बाजूंमध्ये समन्वय साधावा. येत्या १५ ऑगस्टपर्यंत समन्वय व सामोपचाराने हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा.

समाजमाध्यमांवरून कुठल्याही प्रकारचे भडकावणारे संदेश पसरू नयेत, यासाठी सायबर विभागाने दक्षता घ्यावी. जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचनाही पोलीस विभागाला प्रा. शिंदे यांनी दिल्या. बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here