जामखेड न्युज – – –
राज्यात जमिनीचे तुकडे पाडून त्याची खरेदी-विक्री करण्यावर सरकारने आता काही निर्बंध आणले आहेत. या निर्बंधांनुसार आता जमिनीचे गुंठ्यात तुकडे पाडून त्याची थेट खरेदी अथवा विक्री करता येणार नाही. जमिनीचे गुंठ्यांत तुकडे पाडून त्याची खरेदी अथवा विक्री करायची असेल, तर त्यासाठी सक्षम प्राधिकरण अथवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
गुंठ्यात जमीन खरेदीसाठी ‘हे’ करावे लागेल
समजा एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे. त्या सर्व्हे नंबरमधील एक, दोन अथवा तीन गुंठे जागा तुम्ही विकत घेणार असाल तर, त्याची दस्त नोंदणी होणार नाही. त्यासाठी त्या सर्व्हे नंबरचा ले-आऊट करून त्यात गुंठ्यांचे तुकडे पाडून त्याला जिल्हाधिकारी अथवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक असेल. अशाच ले-आऊटमधील गुंठ्याने विकत घेतलेल्या जमिनीच्या व्यवहाराची नोंदणी होणार आहे.
पूर्वीच्या व्यवहारासाठीही मान्यता लागणार
दरम्यान यापूर्वी तु़कड्यात जमिनीची खरेदी अथवा विक्री केली असेल, तर आता अशा व्यवहारासाठीसुद्धा परवानगी घ्यावी लागणार आहे; मात्र एखाद्या जमिनीची भूमी अभिलेख विभागामार्फत हद्द निश्चिती होऊन मोजणी नकाशा देण्यात आला असेल, तर अशा तुकड्याने खरेदी -विक्री केलेल्या जमिनीसाठी परवानगी आवश्यक राहणार नाही.
प्रमाणभत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे खरेदीखत बंद
दिनांक 12/ 07 /2021 रोजी नोंदणी महानिरिक्षक पुणे यांनी काढलेल्या आदेशानुसार प्रमाण भुत क्षेत्रा पेक्षा कमी क्षेत्राचे खरेदीखताचे व्यहार बंद करण्यात आले आहेत. प्रमाणभुत क्षेत्रा पेक्षा कमी क्षेत्राचे व्यहार करण्यासाठी सहायक नगररचना विभागाकडुन लेआऊट मंजुर करुन घ्यावा किंवा सक्षम अधिकारी यांचे कडील परवानगी असल्यास खरेदीखत करण्यात येतील










