…अन् शेवटच्या सहा सेकंदांमध्ये भारताने सामना जिंकला; ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला

0
231
जामखेड न्युज – – – 
उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केला आहे. भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढय़ जर्मनीला पराभूत केलं. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. परंतु बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले.
शेवटच्या सहा गढी थरारक विजय
अत्यंत रोमहर्षक सामन्यामध्ये भारताने अगदी शेवटच्या सेकंदाला विजयावर शिक्कामोर्तब केलं. सामना अगदी शेवटच्या मिनिटामध्ये पोहचला असतांना भारताकडे असलेली एक गोलची आघाडी मोडून काढण्यासाठी जर्मनीचा संघ प्रयत्न करत होता.  सामन्यातील शेवटचे सहा सेकंद शिल्लक असतांना जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ही जर्मनीची शेवटची संधी होती. कारण हा गोल झाल्यास सामना बरोबरीत सुटणार होता तर दुसरीकडे भारताने हा गोल वाचवल्यास ४१ वर्षांनी पदकावर नाव कोरणार होता. पंचांनी शिट्टी वाजवताच जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलपोस्टजवळ भिंत बनून उभ्या असणाऱ्या गोलपकीपरने म्हणजेच श्रीजेशने हा प्रयत्न हाणून पाडला आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला.
४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपला !
दरम्यान, अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत भारतीय संघ एकवेळ १-३ असा पिछाडीवर पडला होता. मात्र या पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत भारताने ५-३ अशी आघाडी घेतली आणि अखेरीस ५-४ अशा फरकाने विजय मिळवसा भारतीय हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. आज झालेल्या लढतीत सिमरनजीत सिंगने दोन आणि हरमनप्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या या ऐतिहासिक यशात मोलाचा वाटा उचलला.
पंतप्रधान मोदींनी केले कौतुक
दरम्यान या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. मोदी यांनी ट्विट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ऐतिहासिक! असा दिवस जो प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात कोरला जाईल. कांस्य जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. या पराक्रमाने त्यांनी संपूर्ण राष्ट्राची, विशेषत: आपल्या तरुणांच्या कल्पनाशक्तीवर विजय मिळवला आहे. भारताला आमच्या हॉकी संघाचा अभिमान आहे,’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here