परवानगी दिलेल्या वेळेनंतर सुरु असलेल्या आस्थापना बंद करा -जिल्हाधिकारी

0
262
जामखेड न्युज – – – – 
      कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत नसल्याने जिल्ह्याच्या काही तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा गतीने वाढताना दिसून येत आहे. काही ठिकाणी परवानगी दिलेल्या व्यतिरिक्त आस्थापना सुरु असल्याचे दिसत आहे. अशा आस्थापना बंदची कारवाई करण्यात यावी. प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात तालुका यंत्रणांनी पावले उचलावी. कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास आणि प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यास सर्वोच्च प्राथमिकता द्यावी, असे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, रोहिणी नऱ्हे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालय येथून तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे तालुका स्तरावर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, जिल्ह्यात सातत्याने रुग्णवाढ नोंदवली जात आहे. ही रोखण्यासाठी स्थानिक यंत्रणेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करणे आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन या महत्वाच्या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हिवरे बाजार पॅटर्न अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समित्यांनी त्यांची जबाबदारी चोखपणे बजावली पाहिजे. जिल्ह्याचा आरटीपीसीआर चाचण्यांच्या बाधित दर (पॉझिटीव्हीटी रेट) मागील आठवड्यात जवळपास आठ टक्के इतका झाला आहे. हा दर असाच वाढत राहिल्यास जिल्ह्यात पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद करावे लागतील. त्यामुळे कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन कऱण्यास प्रवृत्त कऱणे आणि असे करण्यास टाळाटाळ कऱणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कारवाई करणे याकडे तालुका यंत्रणांनी लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.
    गेल्या आठवड्यात पाथर्डी, शेवगाव, संगमनेर, पारनेर, राहुरी, नेवासा आदी तालुक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. क्षीरसागर यांच्यासह भेटी दिल्या. त्यावेळीही परवानगी दिलेल्या वेळेव्यतिरिक्त आस्थापना सुरु असल्याचे चित्र दिसून आले. कोरोना संसर्ग वाढण्यास असे प्रकार कारणीभूत ठरत आहेत. महानगरपालिका क्षेत्रातही सायंकाळीही आस्थापना सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. संबंधित यंत्रणांनी प्रतिबंधात्मक कारवाई गतिमान करावी, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या.
      लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन केले जात असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. तालुका यंत्रणांनी अशा तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कारवाई कऱणे अपेक्षित आहे. याशिवाय, गाव, तालुका, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या. महानगरपालिका क्षेत्रात आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या खूप कमी आहे. बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील सर्वांच्या आरटीपीसीआर चाचण्या घ्याव्यात, लक्षणे असणाऱ्या व्यक्तींच्याही चाचण्या घ्याव्यात. आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश त्यांनी महानगरपालिका यंत्रणेला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here