“आदित्यजी, …त्यावेळी तुमचं नाव सुवर्ण अक्षरात लिहावं लागेल”; काँग्रेस मंत्र्यांकडून कौतुक

0
295
जामखेड न्युज – – – 
मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचं बांधकाम केलं जाणार आहे. याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाच्याप्रसंगी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आदित्य ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होण्यात आदित्य ठाकरे यांचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगत त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल पाटील यांनी आभार व्यक्त केलं.
कार्यक्रमात बोलताना सतेज पाटील म्हणाले, “बऱ्याच वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला होता. तांत्रिक अडचणीतून या प्रकल्पाचा सुटका कधी होणार याची उत्सुकता इथल्या सामान्य रहिवाशांना होती. पण, ज्यांच्या हाती लोकांनी या मतदारसंघाचं नेतृत्व दिलं, त्या आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पासाठी वर्षभरात ५० बैठका तरी घेतल्या असतील. हा प्रकल्प सुरू व्हावा, लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी भूमिका त्यांनी घेतली”, असं पाटील म्हणाले.
“प्रकल्पासाठी पाठपुरावा करणारा असावा लागतो. सुदैवाने आदित्य ठाकरे यांच्या रुपाने या प्रकल्पाला पाठपुरावा करणारी व्यक्ती भेटली. या प्रकल्पात काही तांत्रिक अडचणी होत्या. काही मुद्दे होते, रहिवाशांचे विषय होते. सगळ्यांना विश्वासात घेऊन इथल्या नागरिकांची भूमिका आहे म्हणून हा प्रकल्प करत असल्याची भूमिका त्यांनी मांडली”, असंही पाटील म्हणाले.
“देशासाठी मुंबई ड्रीम सिटी आहे. रोजगारासाठी लोक या स्वप्ननगरीत आले. पहिल्या पिढीचं स्वप्न रोजगार होतं. माझ्या पिढीचं स्वप्न हक्काचं घरं आहे. हेच स्वप्न पूर्ण करण्याची भूमिका महाविकास आघाडीचं सरकार करत आहे. मधल्या काळात डबल सीट नावाचा एक सिनेमा आला होता. या सिनेमात चाळीतून फ्लॅटमध्ये जाण्याचं स्वप्न एका जोडप्याचं स्वप्न सिनेमात दाखवण्यात आलेलं आहे. नागरिकांना हक्काचं घर देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे”, असं आश्वासन सतेज पाटील यांनी यावेळी दिलं.
“म्हाडा देशातील अग्रणीय संस्था आहे. पारदर्शकपणे लॉटरी होते. म्हाडाने हा विश्वास निर्माण केला आहे. भविष्यकाळात लोकांना चांगलं आणि हक्काचं घर देण्याची सरकारची भूमिका आहे. कोविडचं संकटात ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’च्या माध्यमातून राज्य कोविड मुक्त करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. आता माझं कुटुंब, माझं घर अशी भूमिका मुख्यमंत्री आणि सरकारला घ्यावी लागेल. आता हा महत्त्वकांक्षी प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. लवकरात लवकर हा प्रकल्प कार्यान्वित होईल. येणाऱ्या काही वर्षांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार या सर्वांच्या हस्ते चावी देण्याचा कार्यक्रम आम्ही करू. या खात्याचा मंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी पुढाकार घेतला. हा प्रकल्प होण्यात सिंहाचा वाटा आहे. ज्यावेळी या प्रकल्पाचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळी आदित्यजी, तुमचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहावं लागेल”, अशा शब्दात सतेज पाटील यांनी आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here