अहो… चोरी झालीच नाही हिशोब लागलाच नाही!, नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये नजरचूक!!! 

0
185
जामखेड न्युज – – – – 
नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाख रुपयांच्या नोटा चोरी प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं आहे. करन्सी नोट प्रेसमध्ये चोरी झाली नसून नजर चूक असल्याचा खुलासा करन्सी नोट प्रेस प्रशासनाने केला आहे. ज्या दोन सुपरवायझरच्या नजरचुकीमुळे हा संपूर्ण गोंधळ घडला, त्या दोघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. नोट प्रेस प्रशासनातल्या बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी सुपरवायझरचा बळी दिला जात आहे, अशी सध्या चर्चा आहे.
*काय आहे प्रकरण?*
हाय सिक्युरिटी झोन असलेल्या आणि देशभरातील नोटा छपाईचं मुख्य केंद्र असलेल्या नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मध्ये चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये यापूर्वी देखील चोरीच्या तुरळक घटना घडल्या, मात्र प्रशासनाने अंतर्गत चौकशीतच हे प्रकरण निकाली काढले होते. तब्बल 5 लाख रुपयांचा हिशोब लागत नसल्याने ही चोरी आहे की अपहार याबाबत चौकशी सुरु करण्यात आली होती. हे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याने याबाबत बोलण्यास नोट प्रेस प्रशासकीय अधिकारी किंवा युनियन लीडरही तयार नव्हते. अनेक दिवसांपासून 5 लाखांचा हिशोब लागत नव्हता, पण प्रकरण दडपून ठेवण्याचा प्रयत्न असफल ठरल्याने अखेर नोट प्रेसच्या अधिकाऱ्यांना याबाबत पोलीस स्टेशन गाठावं लागलं, अशी चर्चा होती.
*फेब्रुवारीपासून बंडल गहाळ*
दरम्यान, या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसांकडून माहिती देण्यात आली. 500 रुपयांचे 10 तयार बंडल (शंभर नोटांचे एक बंडल) असे 5 लाख रुपये गहाळ झाल्याचं पोलिसांनी सांगितले होते. 12 फेब्रुवारीपासून हे बंडल गहाळ झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. करन्सी नोट प्रेस प्रशासनाने अंतर्गत चौकशी अहवाल पोलिसांना सुपूर्द केल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला होता. या तपासा दरम्यान करन्सी नोट प्रेसमधील सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले जाणार असल्याचं पोलीस आयुक्त विजय खरात यांनी सांगितलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here