जामखेड न्युज – – –
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या पेगॅसस मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची आणि सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. बुधवारी ममता बॅनर्जी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
आपल्या दिल्ली दौऱ्यात ममता बॅनर्जी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांना भेटणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्याचाही त्यांचा प्रयत्न होता. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर चाचणीच्या बंधनामुळे ही भेट टाळावी लागल्याचे ममता बॅनर्जींनी सांगितले. युवक काँग्रेसमध्ये सहकारी राहिलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ, आनंद शर्मा यांना ममता बॅनर्जींनी भेटीसाठी बोलावले होते. तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कवी जावेद अख्तर, शबाना आजमी यांनाही भेटीसाठी वेळ दिला आहे.
हेही वाचा: महापुरामुळे 4000 कोटीं रुपयांचं नुकसान, 209 जणांनी गमावला जीव
ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ७, लोककल्याण मार्ग या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान कोरोना संकटाच्या मुकाबल्यासाठी पश्चिम बंगालला अधिक प्रमाणात लस आणि औषधांची आवश्यकता असल्याची मागणी त्यांनी पंतप्रधानांच्या कानावर घातली. ही औपचारिक भेट असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच पंतप्रधानांनी या मागणीची दखल घेतल्याचे स्पष्ट केले. मात्र, या भेटीतील चर्चेचा तपशील सांगण्याचे टाळले.
सध्या ‘पेगॅसस’प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून तृणमूलनेही याच मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांचे उत्तर भर सभागृहामध्ये फाडून टाकल्याप्रकरणी तृणमूल खासदार शंतनू सेन यांना अधिवेशन काळापुरते निलंबित करण्यात आले आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममतांचे राष्ट्रीय राजकारणात येणे महत्त्वपूर्ण मानले जात आहे.